- Log in to post comments
काल रात्री मिपावरील एक ज्येष्ठ सदस्य श्री.मुक्तसुनीत यांची एका कवितेसंदर्भातील विनंती पु.वि.वर वाचावयास मिळाली. त्याचवेळी हेही आठवले की, श्री.मुक्तसुनीत याच धर्तीच्या एका इंग्रजी संस्थाळावरील नामवंत सदस्य आहेत आणि तेथील भारतातील विविध प्रांतातील, विविध भाषिक सदस्यांसमवेत संवाद साधताना ते मराठी साहित्याविषयी भरभरून लिहित. योगायोगाने आज 'पुस्तकविश्व' चा अतिशय देखणा असा पहिला अंक प्रकाशित झाल्यावर 'पुस्तकाविषयी' सदस्यांमध्ये किती प्रेमाची भावना निर्माण करता येऊ शकते याचे प्रत्यंतर आले. श्री.मुक्तसुनीत यांनीही एकदा त्या इंग्रजी संस्थळावर 'अंतर्नाद' या दिवाळी अंकात आलेल्या "शतकातील -१९०० ते २००० - सर्वोत्कृष्ट २० पुस्तके' हा विषय छेडला होता आणि त्या धाग्यावर मराठी तसेच अमराठी सदस्यांत झालेल्या एका छान चर्चेची आठवण झाली. सुदैवाने मी ती पुस्तके एका फाईलमध्य नोंद करून ठेवली असल्याने जरी "अंतर्नाद" तो (२००७ की २००८?) अंक माझ्याजवळ नसला तरी ती पुस्तकाची लिस्ट आहेच. आज सहज दिवाळी अंकानिमित्ताने मी त्या यादीकडे नजर टाकल्यावर असे दिसून आले की, २००० नंतर एक दशक झाले आहे....मग त्या यादीत बदल करावा असे आजच्या वाचकाला वाटेल्/वाटते का?
२००० ते २०१० या दशकात कितीतरी (नव्या पिढीतील लेखकाची विविध ललित पुस्तके) प्रकाशित झाली आहेत. त्यातील एखादे-दुसरे निवडून तसेच शतकातील २० पैकी काही पुस्तके काढून टाकण्यास आजचा वाचक धजेल काय? विशेष म्हणजे "अंतर्नाद" च्या २० सर्वोत्कृष्ट पुस्तकाच्यावेळी जरी वाचकांना १९०० ते २००० अशी १०० वर्षे दिली होती तरीही ज्या हजार-बाराशे वाचकांनी त्यावेळी आपली मते नोंदविली होती, त्यांनी १९८० नंतर प्रकाशित झालेले १ च पुस्तक निवडले होते. याचा अर्थ असा घ्यायचा काय...की १९८० नंतर 'सकस आणि काळाच्या छाननीवर' उतरणारे टिकावू लेखन होऊच शकलेले नाही? अनेक प्रश्न या संदर्भात उभे राहू शकतात. त्यानुसार इथल्या पुस्तकप्रेमी सदस्यांनी चर्चा करून ही यादी अद्ययावत तर करावीच, पण त्यापेक्षा एखाद्याला आपली "स्वतःची" अशी २० पुस्तकांची यादी स्वतंत्ररित्या इथे द्यावीशी वाटली तर तिचेही आपण इथे स्वागत करू या...जेणेकरून आपला वैयक्तिक ग्रंथसंग्रह समृद्ध करण्यास सहकार्य लाभेल.
"अंतर्नाद" ची शतकातील २० सर्वोत्कृष्ट मराठी पुस्तकाची यादी :
१. शामची आई : साने गुरूजी ~ आत्मचरित्रात्मक कादंबरी
२. रणांगण : विश्राम बेडेकर ~ कादंबरी
३. बनगरवाडी : व्यंकटेश माडगुळकर ~ कादंबरी
४. ययाति : वि.स.खांडेकर ~ कादंबरी
५. कोसला : भालचंद्र नेमाडॅ ~ कादंबरी
६. चिमणरावांचे चऱ्हाट : चिं.वि.जोशी ~ विनोद
७. कळ्यांचे नि:श्वास : मालती बेडेकर ~ स्त्रीव्यथेवरील लघुकथा
८. तलावातले चांदणे : गंगाधर गाडगिळ ~ लघुकथा
९. काजळमाया : जी.ए.कुलकर्णी ~ लघुकथा
१०. सखाराम बाईंडर : विजय तेंडुलकर ~ नाटक
११. संपूर्ण केशवसुत : केशवसुत ~ काव्य
१२. विशाखा: कुसुमाग्रज ~ काव्य
१३. मर्ढेकरांची कविता : बा.सी.मर्ढेकर ~ काव्य
१४. मृदगंध : विंदा करंदीकर ~ काव्य
१५. युगांत : इरावती कर्वे ~ महाभारतावर टीकात्मक लेखन
१६. स्मृति-चित्रे : लक्ष्मीबाई टिळक ~ आत्मचरित्र
१७. बलुतं : दया पवार : आत्मचरित्र
१८. आहे मनोहर तरी... सुनीता देशपांडे ~ आत्मचरित्र
१९. व्यक्ती आणि वल्ली : पु.ल.देशपांडे ~ व्यक्तिचित्रे
२०. माणसं! : अनिल अवचट : सामाजिक शोध
एक निरिक्षण >>
१. वीस पुस्तकात कादंबरी प्रकाराला ५ जागा
२. कथासंग्रहाला ३
३. आत्मचरित्राला ३
४. काव्य ४
५. लेख १
६. व्यक्तिचित्रे १
७. समाजचित्रण १
८. विनोद १
९. नाटक १
~ विशेष म्हणजे १०००+ रसिक वाचकांनी मराठी साहित्यात खपाच्या दृष्टीने विक्रमी ठरलेल्या "स्वामी", "मृत्युंजय", "श्रीमान योगी", "झुंज", "बिढार" यांना जसे स्थान दिलेले दिसत नाही, तसेच कादंबरीकार म्हणून महाराष्ट्राला सुपरिचित असलेले सर्वश्री ना.सी.फडके, श्री.ना.पेंडसे, गो.नि.दांडेकर, जयवंत दळवी, आनंद यादव या सारख्या दिग्गजांचा, तसेच आपल्या खास लिखाणाच्या धाटणीने कमालीले लोकप्रिय असलेले व.पु.काळे, शंकर पाटील, रत्नाकर मतकरी, श्री.दा.पानवलकर या लेखकांचाही विचार केलेला दिसत नाही. कवितेत बालकवी, ग्रेस, इंदिरा संत, शांता शेळके यांची अनुपस्थिती जशी जाणवते तशीच दलित लेखनात आपल्या वैशिष्ठ्यामुळे परिचित असलेले बाबुराव बागुल, सुर्वे, ढसाळ यांचीही गैरहजेरी जाणवण्यासारखी आहे. अर्थात २० चीच मर्यादा असल्याने वाचकांनाही निवडीत जादाचा वाव नव्हताच. १९८० नंतरच्या पिढीतील भारत सासणे, विश्वास पाटील यांच्यासारख्या नव्या दमाच्या लेखकांनी मात्र या दशकात नक्कीच स्थान असेल.
यंदाच्या दीपावलीच्या आनंद द्विगुणित करण्यासाठी इथल्या सदस्यांकडून त्यांच्या निवडीच्या अशा २० पुस्तकांची यादी यावी; ही अपेक्षा.
इन्द्रा
(संपादक मंडळास नम्र विनंती >> पुस्तकविश्वच्या सुरूवातीच्या काळात याच विषयावर चर्चा झाली असल्यास हा लेख काढून टाकण्यास हरकत नाही.....इन्द्रा)
अभिप्राय
रैना
रैना · गुरुवार, 25 Nov 2010 - 10:06
मस्त धागा. खूप आवडला.
इथपावेतो ज्या कल्पनाधिष्ठित लेखनाचा (माझ्यावर-एक व्यक्ति म्हणून)दीर्घकाळ परिणाम (impact) झाला,येवढ्या एकाच (कदाचीत अपुर्या)निकषावर ही खालील निष्क्रम यादी.
१. हसरी किडनी - पद्मजा फाटक
२. मुक्काम/ एकेक पान गळावया- गौरी देशपांडे
३. कोसला,बिढार,जरिला,झूल- नेमाडे
४. मर्ढेकरांची कविता
५. युगान्त/ परिपूर्ती- इरावती कर्वे
६. जावे त्यांच्या देशा/ असा मी असा मी/ अपूर्वाई- पु.लं
७. आहे मनोहर तरी- सुनीताबाई
८. नक्षत्रांचे देणे/दिवेलागण- आरती प्रभू/ संध्याकाळच्या कविता- ग्रेस
९. आमचा बाप आन आम्ही- डॉ जाधव /माझं विद्यापीठ- नारायण सुर्वे
१०. बलुतं- दया पवार
११. डोह- कुलकर्णी/वनवास- संत
१२. लव्हाळी/ तुंबाडचे खोत- पेंडसे
१३. माझी जन्मठेप- वि.दा. सावरकर
१४. किमया- माधव आचवल
१५. हिरवे रावे/काजळमाया - जी.ए
१६. स्मृतिचित्रे- लक्ष्मीबाई टि़ळक
१७. शांतता कोर्ट चालू आहे/ हे सर्व कोठुन येते- तेंडुलकर
१८. मृद्गंध/ध्रुपद/ एटु लोकांचा देश/पिशी मावशी आणि तिची भूतावळ- विंदा करंदीकर
१९. वाडा चिरेबंदी- एलकुंचवार
२०. शामची आई
मला वाटतं एक इंग्रजी पुस्तकांचाही असाच धागा होऊन जाऊ द्या. :-)
रोचीन
रोचीन · गुरुवार, 25 Nov 2010 - 10:17 · उत्तर
>>मला वाटतं एक इंग्रजी पुस्तकांचाही असाच धागा होऊन जाऊ द्या.
सहमत आहे!!
अर्धवट
अर्धवट · Wed, 1 Dec 2010 - 15:19
इंद्रदेवांचा विजय असो.. आमची नेहेमीची आरोळी ठोकून झाली आता मुद्द्याकडे वळतो..
लै भारी धागा.. नविन पुस्तके पण कळाली आता मिळवतो आणि वाचतो.. माझी यादी देतोय, म्हणजे आत्तापर्यंत वाचलेल्या पुस्तकांची.. यात सगळे प्रकार आहेत.. म्हणजे आयुष्यावर खोल परिणाम करणारे लेखन आहेच, नविन नजर देणारे आहे आणि केवळ भुरळ घालणारे साहित्यही आहे.. किंवा कदाचित एकाच पुस्तकात हे सगळे प्रकारही असू शकतील..
....
...
काही जागा राखून ठेवत आहे..
शमिश
शमिश · Sat, 4 Dec 2010 - 17:12
माझी यादी सुचेल तशी देतो..
१. बाकी शून्य - कमलेश वालावलकर
२. दुर्गभ्रमणगाथा - गो.नी.दां
३. व्यक्ती आणि वल्ली - पु.ल. ( खरं तर पुलंचं फक्त एकच पुस्तक देणं महा कठीण काम!)
४. स्वामी - रणजीत देसाई
५. पानिपत - विश्वास पाटील
६. मधु मंगेश कर्णिक
७. साद देती हिमशिखरे - जी. के प्रधान
८. कोणा एकाची साधनगाथा - ॐ मालती बाळ
९. राजा शिवछत्रपती - ब.मो. पुरंदरे
१०. महानायक - विश्वास पाटील
११. दुनियादारी - सु.शि.
अभिजितमोहोळकर
अभिजितमोहोळकर · गुरुवार, 9 Dec 2010 - 09:06
एक होता कार्व्हर - वीणा गवाणकर - चरित्रात्मक
जोगीया - ग.दि.माडगूळकर - कवीतासंग्रह
नटसम्राट - वि.वा.शिरवाडकर - नाटक
रक्तरेखा - शशी भागवत - वेगळ्या धर्तीची भय-कादंबरी
किमयागार - अच्युत गोडबोले - विविध वैज्ञानिकांची आणि शोधांची ओळख
तलावातील चांदणे - गंगाधर गाडगीळ - केवळ सुरेख अशा लघुकथा
व्यासपर्व - दुर्गा भागवत - ह्याविषयी मी न लिहिणेच बरे
बळी - विभावरी शिरुरकर(?) - पद-दलीतांच्या जीवनाचे आणि समस्यांचे वास्तव वर्णन
ययाती - वि.स.खांडेकर
व्यक्ती आणि वल्ली - पु.ल.- ईतक सुंदर व्यक्तीचित्रण मी तरी फार वाचल नाही. एकदम चोख!!!!
सागर
सागर · Tue, 14 Dec 2010 - 15:46 · उत्तर
अभिजित,
तुझ्या यादीत शशी भागवतांची रक्तरेखा बघून सुखावलो.
तू शशी भागवतांचेच 'मर्मभेद' वाचले आहेस का? ती त्यांची सर्वोत्कृष्ट कलाकृती आहे (असे माझे मत आहे)
तशा कादंबर्या वाचावयास आवडत असतील तर
नाथमाधवांची वीरधवल आणि
गो.ना. दातार यांच्या बहुतेक सगळ्या कादंबर्या वाच. (जसे कालिकामूर्ति, शालिवाहन=शक, इंद्रभुवनगुहा) नक्की आवडतील :)
अभिजितमोहोळकर
अभिजितमोहोळकर · Wed, 15 Dec 2010 - 11:52 · उत्तर
मी मर्मभेद वाचले आहे, पण रक्तरेखेसारखी कादंबरी मराठीत वाचली नव्हती. मला भागवतांची अजब दुक्कल, वेडीचे रहस्य, पुनःप्रहार इ.इ.पुस्तके वाचायची आहेत. मिळाली की वाचेन.
दातार आणि नाथ माधवांच्या अनेक कादंबर्या वाचल्या आहेत. नाथ माधवांच्या स्वराज्यावरील कादंबर्या,नव्हे कादंबरीमाला खूपच छान आहे
सागर
सागर · Wed, 15 Dec 2010 - 12:30 · उत्तर
आवडत्या पुस्तकात मर्मभेदचे नाव नव्हते म्हणून शंका आली की मर्मभेद वाचले आहे की नाही त्याची.
रक्तरेखा मी पण वाचली आहे. जरा हटके आहे आणि सुंदरही आहेच. पण तरी मला मर्मभेदने जास्त मोहिनी घातली :) बाकी तुझ्या आवडीबद्दल दुमत नाहिये. शशी भागवत छानच लिहायचे.
अभिजितमोहोळकर
अभिजितमोहोळकर · Wed, 15 Dec 2010 - 11:50
मी मर्मभेद वाचले आहे, पण रक्तरेखेसारखी कादंबरी मराठीत वाचली नव्हती. मला भागवतांची अजब दुक्कल, वेडीचे रहस्य, पुनःप्रहार इ.इ.पुस्तके वाचायची आहेत. मिळाली की वाचेन.
दातार आणि नाथ माधवांच्या अनेक कादंबर्या वाचल्या आहेत. नाथ माधवांच्या स्वराज्यावरील कादंबर्या,नव्हे कादंबरीमाला खूपच छान आहे.
अभिजितमोहोळकर
अभिजितमोहोळकर · Wed, 15 Dec 2010 - 11:57 · उत्तर
कृपया अधिकारी व्यक्तींनी काढून टाकावा.
नीधप
नीधप · Wed, 15 Dec 2010 - 20:15
यादीला क्रम नाही. काही खूप पूर्वी वाचलेली आणि अजूनही माझ्या डोक्यात राह्यलेली पुस्तके आहेत.
१. अरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक गोष्टी (सगळेच खंड) - पं. कृष्णशास्त्री व विष्णुशास्त्री चिपळूणकर. जुन्या भाषेसाठी अगदी चावटपणासकट मला अजूनही आवडतात हे सगळे खंड. (गोष्टी)
२. शिवकालीन व पेशवेकालीन महाराष्ट्र - डॉ. शारदा देशमुख (ऐतिहासिक संशोधनात्मक)
३. हे सर्व कोठून येते आणि तेंडुलकरांची सगळी नाटके - तेंडुलकर (लेख व नाटके)
४. युगान्त आणि भोवरा आणि परिपूर्ती - इरावती कर्वे (संशोधनात्मक व ललित लेख)
५. लस्ट फॉर लाइफ - मराठी अनुवाद माधुरी पुरंदरे (चरीत्र)
६. सर्व प्रकाश संत (ललित)
७. सावित्री, मनवा, कालयवन व इतर एकांकिका - पु. शि. रेगे (कादंबर्या व एकांकीका)
८. पंचतारांकित, जावे त्याच्या वंशा, जन्मलेल्या प्रत्येकाला - प्रिया तेंडुलकर (लेख व कथासंग्रह)
९. खेळ नाटकाचा, सततची नाटकं, मधली नाटकं, आताची नाटकं, ऐन वसंतात अर्ध्या रात्री (मिडसमरचे मराठी रूपांतर) - डॉ. राजीव नाईक (संदर्भात्मक लेखन, नाटके)
१०. निरगाठी, दुस्तर हा घाट - गौरी देशपांडे (कादंबरी)
११. पण लक्षात कोण घेतो - ह. ना. आपटे (कादंबरी)
१२. दुष्काळ आवडे सर्वांना - मूळ लेखक पी साईनाथ. अनुवादकाचे नाव आत्ता आठवत नाहीये. (संशोधनात्मक लेखसंग्रह)
१३. आहे मनोहर तरी - सुनीताबाई देशपांडे (आत्मचरीत्र)
१४. वेड्या कविता - सदानंद रेगे (कवितासंग्रह)
१५. चिरीमिरी, अरूण कोलटकरच्या कविता, द्रोण - अरूण कोलटकर (कवितासंग्रह)
१६. भारतीय विवाह संस्थेचा इतिहास - (संशोधनात्मक लेखन)
१७. आळेकरांची सगळी नाटके (नाटके)
१८. पानवलकरांनी त्यांच्या कथेवर बनलेल्या 'अर्धसत्य' चित्रपटाच्या मेकिंग बद्दल लिहिलेले पुस्तक. नाव लक्षात नाहीये. खूप वर्षं झाली वाचून. (अनुभवात्मक लेखन)
१९. स्टुडिओ - सुभाष अवचट (ललित/ स्फुट लेखन)
२०. रारंगढांग - प्रभाकर पेंढारकर (कादंबरी)
--------------------------------------------
वीस झाले पण माझे काही राह्यले
२१. समिधा - साधना आमटे (आत्मचरीत्र)
२२. हंस अकेला - मेघना पेठे (कथासंग्रह)
२३. मौनराग - एलकुंचवार (ललित)
२४. खंडाळ्याच्या घाटासाठी - शुभदा गोगटे (कादंबरी)
२५. जैत रे जैत, माचीवरला बुधा, पडघवली, रूमाली रहस्य - गो नी दांडेकर (कादंबरी)
२६. रथचक्र - पेंडसे (कादंबरी)
२७. सर्व रियासत खंड (ऐतिहासिक संदर्भग्रंथ)
पुलंच्या बद्दल डिट्टो मेघना.
बाकी गाजलेल्या कादंबर्या विशेषतः ऐतिहासिक आणि पौराणिक ह्या ९-१० च्या वयात वाचल्या तेव्हा आवडल्या. पण नंतर ऐतिहासिक संशोधनात्मक आणि संदर्भ पुस्तकं, इन्डॉलॉजी, प्राचीन भारताबद्दलची संशोधनात्मक आणि संदर्भ पुस्तके वाचायची गोडी लागल्यावर फारच पपलू आणि खोट्या वाटू लागल्या. उदाहरणार्थ युगान्त वाचल्यावर मृत्यूंजय फोल वाटायला लागली.
असो...
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 16 Dec 2010 - 05:59 · उत्तर
पानवलकरांनी त्यांच्या कथेवर बनलेल्या 'अर्धसत्य' चित्रपटाच्या मेकिंग बद्दल लिहिलेले पुस्तक. नाव लक्षात नाहीये. खूप वर्षं झाली वाचून. (अनुभवात्मक लेखन)
शूटिंग?
नीधप
नीधप · गुरुवार, 16 Dec 2010 - 09:34 · उत्तर
बरोब्बर!!
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 16 Dec 2010 - 06:42 · उत्तर
नीधप यांच्या यादीतील खालील पुस्तकांनी फार प्रभावित केले :
१. पु.शि.रेगे ~ "सावित्री" ही प्रकाशनयादीत 'कादंबरी' गटातील असली तरी ती आहे एक निखळ कविता. रेगे कादंबरीकार म्हणून जितके भावतात त्याहून कवि म्हणून फारच.
२. लस्ट फॉर लाईफ ~ कादंबरीही भावली आहे (कारण व्हिन्सेट व्हॉन गॉग याच्याविषयी अगोदरच माहिती असल्याने) त्याचप्रमाणे या कादंबरीवरील 'ऑस्कर विजेता' चित्रपटही पाहिला आहे...."टर्नर क्लासिक" या चॅनेलवर वारंवार येतो.
३. अरबी भाषेतील.....(चिपळूणकरांचे वाचायला मिळालेले नाही....पण गौरी देशपांडे अनुवादित 'अरेबियन नाईटस'चे खंड वाचले आहेत....ते देखील काही 'कमी' नाहीत. क्वाएट इंटरेस्टिंग.
बाकी मेघना पेठे, प्रकाश संत, एलकुंचवार, कोलटकर आदी जवळपास सर्वांच्या यादीत येतात याचा विशेष आनंद होतो.
तसेच ह.ना.आपटे, श्री.ना.पेंडसे, दांडेकर यांच्याबद्दलही तसेच.
प्रतिसादात मेघना यानी अर्धसत्यबाबत 'शूटिंग' शीर्षक सांगितले आहेच.... तर पी.साईनाथ यांच्या त्या गाजलेल्या पुस्तकाचा (Everybody loves a good drought) अनुवाद श्री.हेमंत कर्णिक यानी केला आहे....तोही तितकात प्रभावी आहे. साईनाथांचे पुस्तक (ज्याच्या विदासाठी त्यांनी जवळपास एक लाख किलोमीटरहून अधिकचा प्रवास, पाचसहा वर्षे - एकट्याने - केला होता. कादंबरीच वाचतोय की काय असे वाटते.....) तर आजकाल भारतातील जवळपास सर्व विद्यापीठात 'दुष्काळ' विषयावरील मोलाचा संदर्भ ग्रंथ म्हणून प्रचलित आहे.
इन्द्रा
नीधप
नीधप · गुरुवार, 16 Dec 2010 - 09:38 · उत्तर
गौरी देशपांड्यांनी केलेला अनुवाद वाचलेला नाही. बहुतेक समकालीन मराठी भाषेत मला ते आवडणार नाही अशी शक्यता वाटतेय. पण वाचून बघेनच अर्थात. चिपळूणकरांच्या अरेबियन नाइटस मधे सगळ्यात जास्त मजा आपल्याला काहीश्या अनोळखी असलेल्या मराठीमुळे येते.
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 16 Dec 2010 - 07:33 · उत्तर
>> खंडाळ्याच्या घाटासाठी - शुभदा गोगटे (कादंबरी)
किती दिवस लेखकाचे नाव आठवत होतो म्हणजे मग विकत घेता येईल!
पूर्वी (४-६ वर्षे तर नक्की झाली) ग्रंथालयातून आणून झपाटल्यासारखे एका रात्रीत वाचल्याचे आठवते. एका ब्राह्मण मुलाला खंडाळ्याच्या घाटाचे काम चालु असताना आलेले अनुभव अप्रतिम आहेत. खंडाळ्याच्या घाटामागचे परिश्रम, तेव्हाची सामाजिक परिस्थिती, आर्थिक / अंश्रद्धेने आलेल्या अडचणी यांच्या छान मागोवा मनात घर करून आहे.
आता पुन्हा मिळवून वाचलेच पाहिजे पुस्तक
नीधप
नीधप · गुरुवार, 16 Dec 2010 - 09:42 · उत्तर
मी पण अक्षरशः झपाटल्यासारखी वाचून काढली होती. नुकतेच अत्रे सभागृहात जे पु. प्र. होते तिथे पेपरबॅक मिळाली. लगेच उचलली.
नीधप
नीधप · गुरुवार, 16 Dec 2010 - 09:44
माझ्या यादीत एलकुंचवारांची वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी, युगान्त, आत्मकथा ही नाटकं लिहायचे राहून गेलेय. आता ते कसे अॅड करू?
मृत्युन्जय
मृत्युन्जय · Mon, 3 Jan 2011 - 13:39
ही माझी यादी, इतरांप्रमाणेच निश्चित असा क्रम नाही (मृत्युंजय वगळता)
१. मृत्युंजय- शिवाजी सावंत
२. शाळा - मिलिंद बोकील
३. मिरासदारी - द मा मिरासदार
४. जावे त्यांच्या देशा - पु लं
५. पावनखिंड - रणजित देसाई
६. आहे मनोहर तरी - सुनिता देशपांडे
७. आपण सारे अर्जुन - व पु काळे
८. सहा सोनेरी पाने - सावरकर
९. वाघ सिंह माझे सखे सोबती - दामू धोत्रे
१०. सर्वोत्कृष्ट मराठी कथा (विविध कथांचे संपादन आहे. १० खंड आहेत. प्रकाशक आत्ता आठवत नाहीत)
११. फाळणीचे दिवस - वि गो कुलकर्णी
१२. ययाती - वि स खांडेकर
१३. पानिपत - विश्वास पाटील
१४. तिसरा धृव - रमेश देसाई
१५. अर्थात - अच्युत गोडबोले
१६. द्रोहपर्व - अजेय झणकर
१७. प्रकाशवाटा - डॉ. प्रकाश आमटे
१८. राऊ - ना सं इनामदार
१९. दुनियादारी - सुहास शिरवळकर
२०. स्मृतिचित्रे - लक्ष्मीबाई टिळक
शक्यतो अनुवादित पुस्तके नाही दिलेली. नाहीतर पॅपिलोन आणि टाइमलाइन शिवाय आमची यादी पुर्ण होउच शकत नाही.
सागर
सागर · Mon, 3 Jan 2011 - 14:27 · उत्तर
सर्वोत्कृष्ट मराठी कथा (विविध कथांचे संपादन आहे. १० खंड आहेत. प्रकाशक आत्ता आठवत नाहीत)
हे १० खंड राम कोलारकरांचे आहेत. प्रकाशक - पॉप्युलर प्रकाशन
अप्पा जोगळेकर
अप्पा जोगळेकर · Sun, 16 Jan 2011 - 12:23
आचार्य अत्रे यांचे एकही पुस्तक यादीत नाही हे पाहून आश्चर्यच वाटले.
सागर
सागर · Sun, 16 Jan 2011 - 18:30 · उत्तर
खरे तर टॉप २० निवडणे तसे कठीणच असते.
मी कर्हेचे पाणी ला माझ्या यादीत समाविष्ट करु नाही शकलो याची खंत आहेच. पण माझी २० पुस्तकांची यादी निवडताना जे माझे निकष होते त्यात आचार्य अत्रे यांचे पुस्तक आले नाही.
आचार्य अत्रे यांची सगळी ग्रंथसंपदा वाचावी अशीच आहे. प्रभावी वक्ता तितकाच प्रभावी लेखक असे व्यक्तीचित्र क्वचितच बघावयास मिळते.
तुमच्या मताशी सहमत आहे. आचार्य अत्रे यांचे पुस्तक एकाच्याही यादीत आलेले नाही हे मलाही थोडे खटकले पण आश्चर्य नाही वाटले. शेवटी प्रत्येकाचे निवडीचे स्वतःचे काही निकष असतातच ना?
अप्पा तुमची २० पुस्तकांची यादी पहायला नक्की आवडेल :)