मुखपृष्ठ

माझे शेल्फ

अशी माणसं : अशी साहसं

इंग्रजी शीर्षक
Ashi Manasa : Ashi Sahasa
सारांश

सुलभा प्रभुणे कोवळे दिवस, सत्तांतर, करूणाष्टके अशी अनेक पुस्तके लिहिणारे, जंगल वाटांबद्दल अतिशय आत्मीयतेने लिहिणारे व्यंकटेश माडगूळकर यांची वेगळी ओळख करुन द्यायला पाहिजे असे अजिबात नाही. कॉलजच्या त्या अधाशासारख्या वाचण्याच्या वयात माडगूळकर एकदा हातातपडल्यावर आपण त्यांच्या लेखनाच्या प्रेमात कधी पडलो हे समजतच नाही. अतिशय बारकाईने केलेले निरिक्षण, प्रत्येक अनुभव अतिशय मनापासून घेतलेला, अतिशय साधी सरळ पण थेट हृदयाला हात घालणारी त्यांची भाषा, ह्या त्यांच्या सगळ्याच गोष्टी अतिशय सुरेख आहेत. त्यांनीच लिहिलेले हे आणखी एक पुस्तक म्हणजे अशी माणसे : अशी साहसं. माडगूळकर स्वतः कायमच वेगळ्या वाटांनी चालत राहिले. त्यामुळे स्वतःच्या पावलांनी नव्या वाटा पाडणारे, कितीही कष्टदायक प्रवास असला तरी आपल्याला हवे ते मिळविण्याचा ध्यास घेतलेली माणसे हा त्यांच्या आवडीचा भाग. अशा अनेक लोकांची पुस्तके त्यांच्या संग्रहात असल्याने त्यांच्या वर वेळोवेळी लेख लिहिले. ते वाचकांना अतिशय भावले. त्यामुळे ही पुस्तके कुठे मिळतील? लेखकांबद्दल अधिक माहिती विचारणारे प्रश्न वाचक करत असत. तेव्हा श्री. ह.मो. मराठे हे किर्लोस्कर मासिकाचे संपादन करत होते. त्यांनी माडगूळकरांना अशा साहसी संशोधकांवर लेख लिहिण्याची विनंती केली. त्यानुसार सामान्य वाचक, वन्य प्राण्यांवर प्रेम करणार्या, वेगळेच साहस करण्याची आवड असणार्यांना ओळख व्हावी म्हणून हे लेख लिहिले आहेत. ह्या पुस्तकात एकूण 8 लेख आहेत. जिम कॉर्बेट, सलीम अली, जेन गुडाल, फर्ले मोवॅट, मारूती चितमपल्ली वगैरे नावे आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहेत. पण तरीही सगळेच फक्त जंगलात हिंडणारे नाहीत. तर नाईल नदी एकट्यानेच पार करणारा कूनो स्टुबेन आहे, सिंदबादसारखा सात सफरी करणारा टिम सेव्हरिन आहे. प्रत्येकाची गोष्ट वेगळी, प्रत्येकाचे त्यामागची कारणे वेगळी पण झपाटलेपण हे सगळ्यांमध्ये सारखॆच आहे. आपण एखादी अत्यंत अवघड गोष्ट ठरविणे आणि मग त्याचा न कंटाळा करता पाठपुरावा करणे हे सोपे नाही. ते ‘येरा गबाळ्याचे काम’ नाही. पहिला लेख टिम सेव्हरिनवरचा आहे. स्वतः आयरिश. भूगोल विषयाचा अभ्यासक, त्याने सिंदबादच्या सात सफरी वाचल्यावर ह्या गोष्टी खर्या आहेत का हे शोधण्यासाठी वयाच्या बेचाळीसव्या वर्षी आपणही असा प्रवास करू या हे ठरविले. त्याप्रमाणे तयारीला लागला. त्यासाठी त्याने नवव्या शतकातील जहाजे कशी असत, अरबी व्यापाराचे स्वरुप काय होते हे सर्व अभ्यासायला सुरुवात केली.बरीच शोधाशोध केल्यावर त्याला सोळाव्या शतकाच्या सुरुवातीचा नकाश मिळाला. एकही खिळा ना वपरता अरबी जहाजे तयार होत असत ही माहीती मिळल्यावर तो त्याच्या शॊधासाठी ओमानला गेला. बरेच निरिक्षण केले. या मध्ये बहुधा त्याची इच्छाशक्ती फार जबर असणार त्यामुळे ओमानच्या सुलतानाने ह्या त्याच्या संपूर्ण सफरीचा खर्च करण्याची तयारी दाखवली. मग तिथंपासून ते जुन्या पध्दतीने जहाज बांधणे व ते प्रत्यक्ष पाण्यात उतरवणे हा अतिशय रोमहर्षक प्रवास पुस्तकातूनच वाचायला हवा. नंतर त्या सोहर जहाजातून पुढचा केलेला प्रवास हा खरोखरच सिंदबादच्या सफरीइतकाच विलक्षण आहे. 3 नोव्हेंबर 1980 ला निघालेले जहाज 1 जुलैला 1981 ला चीनला पोहचले. ‘द सिंदबाद व्हॉयेज’ हे प्रवासवृत्तावर लिहिलेले टिम सेव्हरिनचे पुस्तक 1982 मध्ये प्रसिध्द झाले. ते मोठ्या आकाराचे व 20 पानांचे आहे. त्याचा संक्षिप्त अनुवाद म्हणजे हा पहिला लेख आहे. त्यानंतरचा लेख चिंपाझींचा अभ्यास करून पीएच.डी मिळवलेल्या जेन गुडाल बद्दल आहे. पण तिने पुढे ह्युगो ह्या छायाचित्रकाराशी लग्न केल्यावर दोघांनी मिळून टांझानियातील गोरोंगारो इथे राहून रानकुत्री, तरस, कोल्ही यांचा अभ्यास केला. त्यावर ‘इनोसंट किलर्स’ हे पुस्तक लिहिले त्याची ओळख ह्या लेखातून करून दिली आहे. त्यांनी बरोबर आपला नऊ महिन्यांचा मुलगा नेला होता. हे वाचताना आपल्याच छातीत धडधडायला लागते. दोघांनी केलेले निरिक्षण, न कंटाळता तासनतास बारकाईने पहाण्यात घालवलेले दिवस हे वाचताना तर थक्कच व्हायला होते. इतक्या लहान मुलाला सोबत घॆऊन जंगलात राह्यचे हे सुध्दा आपल्या सारख्यांना किती कठीण वाटते मग अशा कोणत्या प्रेरणांमुळे असे साहस करावेसे वाटते हे कळत नाही. पुढचा लेख ‘हरिण पारधी’ नावाचा असून तो फर्ले मोवॅट बद्दल आहे. त्याने उत्तरध्रुवाकडील ओसाड प्रदेशात केलेला प्रवास ही एक अदभूत वाटावी अशी कथा आहे. मूळ पुस्तक 1952 मधले आहे. 1935 मध्ये फर्ले जेव्हा पंधरा वर्षांचा होता तेव्हा आपल्या काका बरोबर त्याने आर्क्टिकचा पहिला प्रवास केला होता. तेव्हा त्याने रेल्वेने जाताना अर्धामैल रुंदी असलेला आणि सुमारे तासभर संथ गतीने रेल्वे रूळ ओलांडून पलिकडे जाणारा कॅरिबू हरिणांचा कळप पाहिला. त्याची आठवण त्याच्या मनातून कधीच पुसली गेली नाही.

पुस्तकाची माहिती

प्रकाशन वर्ष
2025
पृष्ठसंख्या
176
भाषा
मराठी
किंमत
65.00
ISBN
9788184983500
समुदायाने जोडले
बंद