- Log in to post comments
मजकूर
भाग-१ दुसर्या पानावर गेल्यामुळे येथे दुसरा धागा सुरु करत आहे
एवढ्यात मी विकत घेतलेली नवीन पुस्तके:
ऑर्डर दिली आहे. २-३ दिवसांत मिळतील
- नातिचरामि - मेघना पेठे ( स्थगित. पुढच्या महिन्यात पुण्याच्या भेटीत मिळणार आहे)
- रारंग ढांग - प्रभाकर पेंढारकर
- एका तेलियाने - गिरिश कुबेर
- आदिबंध - बापू करंदीकर
- एकोणिसावी जात - महादेव मोरे
चर्चा प्रकार
अभिप्राय
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 13:11
क्रमांक ४ वगळता....सर्व पुस्तके माझ्याकडे आहेत...पण तीवर आता इथे काही लिहिणे म्हणजे तुमचा वाचनातील रस कमी करण्यासारखे होईल. पण खूपच चांगली आणि अनुभवसंपन्न आहेत ही पुस्तके.
(थोडीसी दुरुस्ती करा >>> "रारंग ढांग" चे लेखक प्रभाकर पेंढारकर आहेत....भालचंद्र नव्हेत.)
-- शक्य झाल्यास प्रभाकरांचेच "एका स्टुडिओचे आत्मचरित्र" ही संग्रही ठेवा....इतिहासच आहे....मराठी सिनेसृष्टीच्या एका आपुलकीच्या निर्मिती स्थळाचा.
इन्द्रा
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 13:45 · उत्तर
धन्यवाद इंद्रराज,
पुस्तकांची यादी टंकत होतो तेव्हा भालजी पेंढारकरांचा गनिमी कावा का छत्रपति शिवाजी यापैकी कोणता चित्रपट पहायचा विचार करत होतो. ;)
दुरुस्ती केली आहे.
धन्यवाद
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 14:01 · उत्तर
आदिबंध - बापू करंदीकर
हे नवीनच पुस्तक आहे
मुख्य करुन आयटी क्षेत्रातील वातावरण यात सुरेखपणे चितारले गेले आहे असे परिक्षण आहे या कादंबरीचे.
प्रोजेक्ट च्या डेडलाईन्स, त्यातील राजकारण अशा वातावरणात फुललेली ही कादंबरी आहे.
मी आयटी क्षेत्रात काम करत असल्यामुळे उत्सुकता आहे या पुस्तकाबद्दल
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Mon, 1 Nov 2010 - 15:26 · उत्तर
हे बापू म्हणजेच प्रभाकर करंदीकर ना? पुण्याचे माजी विभागीय आयुक्त? आयएएस - त्यामुळे या पुस्तकात थोडंफार 'सरकारी काम आणि सहा महिने थांब' असंही काही आहे का? हे 'मायबोली'वरही असतात.
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 16:14 · उत्तर
प्रभाकर करंदीकर हेच बापू या नावाने जास्त ओळखले जातात :)
कॉपोर्रेट कंपन्यांमधलं युद्ध, शह-काटशह याचं राजकारण, पार्टी कल्चर अशा वातावरणात या कादंबरीचा बाज आहे. त्यामुळे सरकारी लालफितीचाही यात समावेश ओघाने असणारच.
वाचून झाल्यावरच मी यावर काही बोलू शकेन. मायबोलीवर एक परिक्षण आहे या पुस्तकाचे
त्यासाठी इथे टिचकवा
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 1 Nov 2010 - 17:42 · उत्तर
http://www.epapergallery.com/ebooks/index.aspx?BookID=271109073517
या दुव्यावर या पुस्तकाचा काही भाग वाचता येईल
यशोधरा
यशोधरा · Tue, 2 Nov 2010 - 08:48 · उत्तर
सागर, हे लेखक करंदीकर "मायबोली"वरचे करंदीकर होय! मला ठाऊक नव्हते, किंवा लक्षात आले नाही... त्यांचे "मायबोली"वरचे विश्लेशणात्मक लेख वाचले आहेत आणि चांगले असतात. पुस्तक पहायलाच हवे. धन्यवाद इथे माहिती दिल्याबद्दल. :)
सागर
सागर · Tue, 2 Nov 2010 - 13:37 · उत्तर
बहुतेक सोमवारी मला मिळेन हे पुस्तक. लगेच वाचले गेले तर अभिप्राय देईनच यशोधरा,
बहुतेक पुण्याला यायच्या अगोदर वाचून होईलसे वाटते आहे.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 1 Nov 2010 - 14:48 · उत्तर
-- शक्य झाल्यास प्रभाकरांचेच "एका स्टुडिओचे आत्मचरित्र" ही संग्रही ठेवा....
सहमत इंद्रा..
गेल्याच महिन्यात घेतलयं..
अगदी संग्राह्य पुस्तक, वेळ मिळाल्यास सविस्तर लिहावे म्हणतो याबद्दल
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 15:10 · उत्तर
जरूर लिही निखिल.....तू जे लिहिशील ते सुंदरच असेल.
प्रभाकरपंतांच्या त्या पुस्तकात निव्वळ शूटिंग आणि झालेल्या सिनेमांची जंत्री नाही तर तेथील जमिनीच्या प्रत्येक फुटाशी लेखकाचे असलेले नाते भावनिकदृष्ट्या शब्दबद्ध झालेले आहे. लहानपणी मी आणि माझे मित्र तेथील शेजारच्या ग्राऊंडवर क्रिकेट खेळत असू (एका कॉलेजचे हॉस्टेल स्टुडिओच्या समोरच आहे). सातत्याने त्या स्टुडिओच्या वातावरणात (म्हणजेच परिसरात...) असल्याने मला स्वतःला जणू त्या पुस्तकातच असल्यासारखे वाटले. "शूटिंग" नावाचा काही प्रकार तिथे चालू असतो असे वाटतच नसे, इतके कौटुंबिक वातावरण असे, म्हणजे कलाकारांचा "मी" पणा....नखरे, मेकअपने भरलेले चेहरे...घाई, गडबड, आरडाओरडा, इलेक्ट्रिक सामानांची जंत्री, गिचमिड, विस्कळीतपणा....असले काहीही प्रकार आम्हाला कधी दिसले नाहीत...अगदी शूटिंग चालू असले तरी आम्ही बाजुच्या कंपाऊंडमधून आमच्या मैदानाकडे सहजगत्या ये-जा करीत असू....रखवालदार असायचा...पण त्याने कधीच आम्हाला हटकले नाही. तो जणू होता फक्त दिदींची गाडी आली की मेन गेट उघडण्यासाठीच....बाकी कित्येक कलाकार, तंत्रज्ञ, हेल्पर...एकतर पायीच येत किंवा सायकलवरून. दोघेचौघेच मोटारसायकल वापरत असल्याचे दिसत होते.
पण...आता गेले ते मनोहारी दिवस....काहीही शिल्लक नाही असे म्हटले तरी अतिशयोक्ती नाही. भालजीनंतर लताबाईंच्याकडे स्टुडिओची मालकी आली खरी...पण तो जुना रुबाब हरवला तो कायमचाच....आता तर अपार्टमेन्टस आणि तत्सम कॉम्प्लेक्सनी सारा परिसर व्यापून टाकला आहे.
तिच गोष्ट शांतारामबापूंच्या 'शांतकिरण' ची. जयप्रभाचा मोडकातोडका बोर्ड तरी किमान आहे अजून... पण "शांतकिरण" ची एक पाकळीही आता त्या एकेकाळच्या भव्य वास्तूच्या जागी शिल्लक नाही. किरण शांतारामनी कोल्हापुरला न येताच परस्पर मुंबईत बसूनच तो स्टुडिओ रेसिडेन्शीअल स्कीमला विकून टाकला....आणि त्या स्कीमवाल्याने पहिले कोणते काम केले असेल तर बुलडोझरने "सुस्वागतम....शांतकिरण स्टुडिओ" ही हेमाडपंथी बांधकामाची रेखीव दगडी कमान आणि त्याशेजारील शंभर वर्षे जुने असलेले वडाचे प्रचंड झाड जमिनदोस्त केले.
"कृष्णेकाठी कुंडल राहिले नाही..." असे विदारक स्थिती सांगण्यासाठी म्हटले जाते....इथे या दोन प्रकरणात कुंडलच काय पण आता कृष्णाही राहिलेली नाही.....ना खेद ना खंत कुणा !
इन्द्रा
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 16:17 · उत्तर
पुण्याच्या डिसेंबर वारीत मनासारखी खरेदी करणार आहे त्यावेळी हे पुस्तक पण बघेन.
घ्यायच्या यादीत हे पुस्तक नोंदवले आहे :)
यशोधरा
यशोधरा · Mon, 1 Nov 2010 - 13:14
नातिचरामी मी तुला चकटफू दिले असते! :(
मी घेतलेली -
मुक्काम
सखा नागझिरा.
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 13:39 · उत्तर
यशोधरा चांगले नाहिये का नातिचरामी?
अजून पुस्तकांची डिलिव्हरी व्हायची आहे. उद्या पाठवणार आहेत रसिक वाले.
कॅन्सल करता येईल.
घेण्यासारखे नसेल तर प्लीज सांग. अजूनही निर्णय बदलता येईल मला :)
यशोधरा
यशोधरा · Mon, 1 Nov 2010 - 13:43 · उत्तर
मला तरी नाही आवडलं. फार सुपरफिशिअल वाटलं.
बर्याच जणांना आवडलेलं आहे आणि त्या पुस्तकाचे स्तुतिपाठ गाणारेही आहेत.
तू आधी हवं तर डिसेंबरमधे माझ्याकडच घेऊन वाच, आणि मग ठरव.
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 13:53 · उत्तर
डिसेंबरात येईन तेव्हा सांगेन तुला. तुझ्याचकडून घेईन.
सध्या तरी यादीतून काढून टाकतो आहे :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 14:41 · उत्तर
"....सध्या तरी यादीतून काढून टाकतो आहे...."
~ तुम्ही घेतलेला हा निर्णय योग्य नव्हता इतकेच मी म्हणेन. यादीत घेण्यापूर्वी इथे चर्चा करून त्याबाबत निर्णय घेणे आणि घेतलेला निर्णय चर्चा झाली म्हणून (पुस्तक न वाचताच...) बदलणे हे एक 'वाचक' या नामाशी प्रामाणिकता दाखवित नाही, असे माझे (जरी ते वैयक्तिक असले तरी....) मत आहे.
वाचल्यानंतर 'ते भिकार आहे..." म्हणून कपाटातून काढून टाकले असते तरीदेखील मी तुमच्या मताचा आदर केला असता, कारण मग ते एका 'वाचका'चे स्वातंत्र्य आहे म्हणून.
मी वाचले आहे 'नातिचरामि'...अगदी सडेतोड आहे....इथे पचनी पडत नाही, हे खरेच आहे...पण 'मीरा' या नायिकेच्या आयुष्यातील एका घटनेवर कथानक आधारित असल्याने व त्याचा परिपाक म्हणून एका स्वतंत्र विचाराने तिने जगलेले ते आयुष्य असल्याने आपण ते अलिप्तपणे पाहिले तरी चालते. कमला दास या मल्याळी लेखिकेचे (इंग्लिश भाषेतील) साहित्य आणि मेघना पेठे यांची जातकुळी एकच आहे.
असो....आशा आहे की माझी ही मते तुम्हाला तुमच्या मतस्वातंत्र्यावर आक्षेप घेणारी वाटणार नाहीत.
इन्द्रा
यशोधरा
यशोधरा · Mon, 1 Nov 2010 - 15:01 · उत्तर
पुस्तक सडेतोड आहे म्हणून पचनी पडत नाही हे म्हणणे म्हणजे इतर वाचकांच्या आकलन शक्तीवर मते देणे झाले! पुसतक वाचूनच मी सागरला माझे मत दिले आहे. सडेतोड पुस्तकांची उदाहरणे म्हणून (आणि उदाहरणेच केवळ) ब्र, दुर्गाबाईंचे आठवले तसे, ( जरा त्यांत आत्मस्तुतीचा धोका त्यांनी पत्करलेला आहे तरीही), शांताबाईंचे सांगत्ये ऐका, गौरीची पुस्तके, इरावतीबाईंची पुस्तके, रेग्यांची विज्ञानवादावरची पुस्तके, विवेकानंदांची, स्वा.सावरकरांची पुस्तके... प्रकाशवाटा, समिधा अशी कितीतरी पुस्तके आहेत. नुसते सतत रडतराऊतासारखे स्वतःच्या समस्या गोंंजारुन जगणे म्हणजे सडेतोडपणा नव्हे!
प्रत्येक प्रश्नाला उत्तर म्हणून सापडेल त्याच्याशी संग करणे, सिगारेटी ओढणे, दारु पिणे ह्यात कसला सडेतोडपणा डोंबलाचा? एक कृती म्हणून वरीपैकी सर्व वा कोणतीही एक गोष्ट करणे हा कोणाचाही हक्क आहेच आणि ते त्यांनी खुशाल करावे, त्याबद्दल काहीही दुमत नाही, ज्याचे त्याचे स्वातंत्र्य. पण त्याला सडेतोड वागणे म्हणण्यापेक्षा पलायनवाद म्हणणे अधिक योग्य!
असो.
सागर पुस्तक वाचणार आहेच आणि मग ते संग्रही ठेवायचे का ते ठरवणारच आहे. तेवढेही स्वातंत्र्य वाचक म्हणून त्याला नाही का? स्वतःची मते त्याच्यावर लादायचा अट्टाहास का?
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 18:30 · उत्तर
गैरसमज करुन घेऊ नका इंद्रराज,
नातिचरामि मी वाचणारच आहे. नातिचरामि चे मी कौतुक ऐकले आहे. म्हणून घेणार होतोच.
पण यशोधराकडे ते पुस्तक आहे आणि पुण्यात मी पुढच्या महिन्यात येणारच आहे, तेव्हा सहजपणे मला यशोधरा देत असताना आताच घ्यायला पाहिजे असे काही मला वाटले नाही. त्यामुळे वाचक म्हणून माझे स्वातंत्र जपले जाणारच आहे. यशोधरा ही माझी एक चांगली मैत्रीण असल्याने तिने मैत्रीच्या अधिकारात हा सल्ला दिला होता एवढेच.
तेव्हा कोणीही गैरसमज करुन घेऊ नये ही विनंती :)
यशोधराने खुलासा केल्याप्रमाणे नातिचरामि वाचल्यावर माझे मत जे असेल ते माझेच असणार आहे आणि पुस्तक आवडले तर मी त्यावर भाष्य पण करेन. मी पुस्तक वाचले नाहिये त्यामुळे यशोधराला ज्या कारणांमुळे हे पुस्तक आवडले नाही त्यावर आता काही बोलणे अयोग्यच ठरेन. तेव्हा तूर्तास माझी नजर सगळी पुण्यनगरीच्या वारीत आणि तयारीत आहे ;)
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 13:57 · उत्तर
यशोधरा,
मुक्काम
सखा नागझिरा
कोणाची आहेत? आणि कोणत्या विषयावर आहेत?
अधिक माहिती करुन घ्यायला आवडेल.
यशोधरा
यशोधरा · Mon, 1 Nov 2010 - 14:05 · उत्तर
मुक्काम गौरी देशपांड्यांचे पुस्तक आहे. तिच्या मनोव्यापारांबद्दलचे, वागणूकीबद्दलचे असे म्हणू. तिच्या मित्र मैत्रिणींबद्दलचे आणि तिच्या आयुष्याबद्दलचे.
सखा नागझिरा - किरण पुरंदरे. नागझिरा अभयारण्यात किरण पुरंदरे ३८० दिवस राहिले होते, जंगलाचं निरिक्षण करत, जंगल वाचत, असं म्हणूयात, त्याची गोष्ट. इथे वाच.
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 17:20 · उत्तर
धन्यवाद यशोधरा,
सुरेशचंद्र वारघडे यांचे क्रौंचकाव्य घेणारच आहे त्याबरोबर सखा नागझिरा देखील नक्की घेणार आहे.
परिचय वाचला पुस्तकाचा. आवडता विषय असेल तर अशी पुस्तके संग्रहात ठेवायला अधिक आनंद होतो :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Mon, 1 Nov 2010 - 17:44
यशोधराताई, तुमचा काहीसा गैरसमज झाला आहे असे दिसते. चला, नव्याने माझी याबाबतीतील भूमिका मांडतो.
मुळात श्री.सागर यानी ५ पुस्तकांची 'एवढ्यात मी विकत घेतलेली पुस्तके...' असे धाग्यात म्हटल्याने व व्याकरणदृष्ट्या ते वाक्य 'चालू पूर्ण वर्तमानकाळ' असल्याने आता त्या विधानापासून ते मागे सरकणार नाही असा होतो; कारण विकत घेण्याची प्रक्रिया झाली आहे. याचाच अर्थ "नातिचरामी' आहे एका ऑनलाईन लिस्टमध्ये म्हणून त्यानी ते घेतले असे नसून त्याबद्दल निश्चितच कुठेतरी त्यावरील प्रतिक्रिया (उलटसुलट) वाचली असणार, समानधर्मी मित्रांसमवेत समोरासमोर चर्चा केली असणार....मगच त्यानी 'शॉपिंग कार्ट' ला क्लिक केले असणार....इतपत लॉजिकली योग्य आहे असे तुम्हीही मानाल.
असे असताना ते सहजगत्या इथे लिहून गेले की, "सध्या तरी यादीतून काढून टाकत आहे..." ~ याचे मला फार वाईट वाटले. "हे घेऊ का?" असा प्रश्न त्यानी प्रथम तुम्हाला खरडीद्वारे विचारला असता तर तुमच्या त्या थेट 'चकटफू देते..." या प्रतिसादामुळे त्यानी नक्कीच ती आपल्या यादीतून काढून टाकली असती, मग त्यानंतर ती विकत घेण्याचा प्रश्नच उदभवला नसता आणि तुम्हा दोघातच तो संवाद घडला असल्यामुळे आताची मतमतांतरे खुल्या चर्चेत आलीही नसती.
पुस्तक सडेतोड आहे म्हणून पचनी पडत नाही हे म्हणणे म्हणजे इतर वाचकांच्या आकलन शक्तीवर मते देणे झाले!
~ नाही....माझ्या विधानाला असे ट्विस्ट करून टाकता येत नाही. मी कुण्याच्याही आकलन शक्तीचा मुद्दा त्या वाक्यात आणलेला नाही. 'पुस्तक सडेतोड आहे म्हणून ज्याना जीवनातील प्रखर वास्तव्य नको तर दिवाणखान्यातील सुबक टीपॉयचाच आनंद हवा आहे त्याना मीरा पचनी पडत नाही...' असा विस्ताराने अर्थ होतो...इथे कुणाच्याही आकलन शक्तीचा अधिक्षेप करण्याचे प्रयोजन येतच नाही. 'नातिचरामी' असो वा अन्य कोणतेही पुस्तक न वाचता ते यादीतून (मुळात असलेले) काढून टाकणे हे 'आदर्श वाचका'च्या व्याखेत बसत नाही....आणि मी श्री.सागर यांच्याकडे त्या व्याखेच्या व्यापक अर्थाने पाहात असल्याने माझे मत जाणीवपूर्वक मांडले.
~ मिपावर दीडदोन महिन्यापूर्वी 'कोसला' बद्दलही असलीच १००+ प्रतिसादांची चर्चा झाली. त्यातील काही बेताल, बालिश प्रतिसाद तर अशासाठी चीड निर्माण करणारे होते की जवळजवळ ७५% सदस्यांनी कोसला वाचलेलीच नाही आणि तरीही बेमुर्वतखोरपणे त्या साहित्यातील मानदंड ठरलेल्या कादंबरीची लक्तरे काढणे चालूच होते. तिथे मी एकही ओळ लिहिली नाही, कारण मी जाणून होतो की माझ्या कोसलाची बाजू घेणार्या भूमिकेवर किती 'लो लेव्हल' चे प्रतिसाद येतील.
इथे "नातिचरामी' बद्दल लिहिले म्हणजे ही कादंबरी सर्वांनी डोक्यावर घेऊन नाचावी या लायकीची आहे असे मी कदापिही म्हणणार नाही....कुठे म्हटलेलेही नाही. (आवश्यकता भासल्यास यापूर्वी ज्या तीनचार मित्रमैत्रीणीमध्ये - जे इथल्या कोणत्याही शाखेचे सदस्य नाहीत - या कादंबरीवर ई-मेलद्वारे मी चर्चा केली आहे, अन् मेघना पेठे यानी पळवाटीधर्तीचा शेवट करून कादंबरी शेवटी किती रद्दड केली आहे, यावर विस्तृत लिहिले आहे....ते पत्रही सागर याना देवू शकतो). मेघना पेठे म्हणजे मार्गारेट मिचेल वा अरुंधती रॉय नव्हे की जिच्या कादंबरीमुळे एक इतिहास निर्माण होईल....पण तरीही तिच्याही लेखन स्वातंत्र्याला जर 'राजहंस' स्वीकारते तर टीका करण्यासाठी का होईना, ती प्रथम वाचणे अन् मगच तिच्याबद्दल अनुकूल/प्रतिकूल मत बनविणे योग्य आहे. (जे तुम्ही आणि मी दोघांनीही त्या त्या अर्थाने केलेले आहेच.)
खंत हीच वाटते की, १९३०-३५ दरम्यान इथे एक 'विभावरी शिरूरकर' पुढे येते आणि हुंड्याच्या विरोधात स्त्री-पुरूषांनी 'लीव्ह-इन' धर्तीचे नाते प्रस्थापित केले तर...असे काहीसे क्रांतिकारी विचार कादंबरीच्या माध्यमाद्वारे मांडते त्यामुळे महाराष्ट्रात सनातन्यामध्ये माजलेला गोंधळ आठवला तर २०१० च्या मेघना पेठेच्या मीराने त्यापुढील पाऊल टाकले म्हणून तिच्या स्त्री-स्वातंत्र्याच्या व्याख्येला विरोध होतोच. पण असो...शेवटी जशी एखाद्या कलाकृतीची बाजू घेणे हे घटनेने दिलेल्या स्वातंत्र्याच्या कक्षेत येते, तद्वतच तिला विरोध करणेही नैसर्गिकरित्या त्याच स्वातंत्र्याचा परिपाक आहे.
तुमच्या प्रतिसादाचा शेवट तुम्ही श्री.सागर यांच्या वाचक-स्वातंत्र्याच्या प्रश्नाने केला आहे. त्याबद्दलच तर मी तो प्रतिसाद लिहिला होता की, पुस्तक जर 'ऑर्डर केलेच आहे, तर वाचून ते भिकार आहे..." असे ठरवून बाजूला ते फेकू शकतात ना? इथे मी माझे मत 'नातिचरामी' बद्दल मांडलेले नसून 'पुस्तक-वाचना' बद्दल मांडले आहे...जे सर्वच ललितकृतीना लागू आहे.
असो....'पुस्तकविश्व' वर मी आलो आहे, ते पुस्तकप्रेमींच्या संगतीत राहण्यासाठी....त्यांच्यासमवेत पुस्तकाच्या दुनियेची विविध अंगाने सफर करण्यासाठी....तेव्हा अकारण इथे धुक्यातील वाटेने प्रवास नको.
धन्यवाद.
इन्द्रा
सागर
सागर · Mon, 1 Nov 2010 - 18:51 · उत्तर
अहो इंद्रराज,
मी मराठी पुस्तके शक्यतो ऑनलाईन खरेदी नाही करत. रसिककडे नाही मिळाले तरच ऑनलाईन बघतो.
नेहमी माझी खरेदीची पद्धत अशी आहे की मी रसिक साहित्यला फोनवरुन ऑर्डर देतो आणि त्यात काही बदल असतील तर संध्याकाळी ते पाठवण्याच्या आत त्यांना कळवतो. आणि मला पुस्तके मिळाल्या नंतरच मी नेटबँकींगद्वारे पैसे ट्रान्स्फर करतो. तेव्हा पुस्तके देण्या-घेण्या च्या प्रक्रियेवर पुस्तके पाठवली जाईपर्यंत माझे नियंत्रण असते. यशोधराने केवळ मैत्री खात्यात मला धाग्यावर सल्ला दिला कारण तिच्याकडे ते पुस्तक होते. आणि हे पुस्तक माझ्याकडे येणारच आहे :)
.'पुस्तकविश्व' वर मी आलो आहे, ते पुस्तकप्रेमींच्या संगतीत राहण्यासाठी....त्यांच्यासमवेत पुस्तकाच्या दुनियेची विविध अंगाने सफर करण्यासाठी
अगदी आदरच आहे तुमच्या या मताचा. तेव्हा जास्त वाईट वाटून घेऊ नये आणि या विषयाला इथेच पूर्णविराम द्यावा ही नम्र, प्रामाणिक आणि मनापासूनची विनंती.
वाचनसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आपण सर्वजण इथे येतो तेव्हा तेच करुयात आपण :)
आता पुढचा वेचा लवकर द्या बरे. ;)
यशोधरा
यशोधरा · Tue, 2 Nov 2010 - 06:54 · उत्तर
>लिहिला होता की, पुस्तक जर 'ऑर्डर केलेच आहे, तर वाचून ते भिकार आहे..." असे ठरवून बाजूला ते फेकू शकतात ना? >> हा सुद्धा सागरचा वा कोणत्याही वाचकाचा चॉईस आहे की त्यला विकतच घेऊन वाचायचे आहे की इतरत्र वाचून मग विकत घ्यायचे वा नाही हे ठरवायचे. ह्यातील कोणतीही कृती केल्याने एखाद्याचे वाचनप्रेम कमी वा जास्त ठरत नाही. हे योग्य वा अयोग्य हे ठरवण्याचा अधिकार तुम्हाला कसा काय मिळतो?
एकाच प्रतिसादात तुम्ही इतकी परस्परविरोधी विधाने करत आहात हे तरी तुमच्या लक्षात येते का? असो. बोलण्यात अर्थ नाही हेच खरं आहे! चालूदे तुमचे.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Tue, 2 Nov 2010 - 09:00 · उत्तर
".....बोलण्यात अर्थ नाही हेच खरं आहे!...."
~ या वाक्याने मला फार आनंद झाला. आभारी आहे !
यशोधरा
यशोधरा · Tue, 2 Nov 2010 - 09:04 · उत्तर
>>".....बोलण्यात अर्थ नाही हेच खरं आहे!...."
~ या वाक्याने मला फार आनंद झाला. आभारी आहे ! >>
ते अपेक्षित होतेच. शेवटी सरड्याची धाव कुंपणापर्यंत हेच खरे.
असो.
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Tue, 2 Nov 2010 - 12:36
सध्या समग्र रिचर्ड डॉकिन्स वाचण्याच्या प्रयत्नात आहे. येत्या काही महिन्यांतर घर बदलणं निश्चित आहे त्यामुळे पुस्तकं विकत घेणं टाळते आहे. पण उधारीवर सुरूवात केली; त्याने १९७६ साली लिहीलेलं एकूण तेरा भाषांत(च) भाषांतरीत झालेलं The Selfish Gene वाचायला सुरूवात केली आहे. The Greatest Show on Earth: The Evidence for Evolution या वर्षाच्या सुरूवातीला धड कॉपी न मिळाल्यामुळे विकत घेतलं नव्हतं. पण कालच इन्स्टीट्यूटच्या पूर्वीच्या डायरेक्टर, राजाराम यांची कृपा होऊन रिव्ह्यूअर्स कॉपी मिळाली. राजारामच्याच भाषेत या पुस्तकात Richard Dawkins - the showman दिसतो.
वर चर्चा चाललेलं '॥नातिचरामि॥' वाचायचा प्रयत्न केला. पूर्वी मिपावरही "या पुस्तकाने" बराच गोंधळ उडवला होता म्हणून पुस्तक ग्रंथालयात दिसल्यावर घेतलं. पहिली तीस पानं कशीबशी वाचली. 'एका मनोरूग्णेचं मनोगत' असं काहीसं पुस्तकाचं नाव शोभलं असतं असं वाटलं. या बाईचं नाव मीरा असावं असं वरच्या चर्चेतून दिसत आहे. पहिल्या तीस पानांत ते मला समजलं नव्हतं. पान क्र तीसाच्यापुढे जाऊन घरातल्या काचसामानाची तोडफोड ओढवून घ्यावी असं वाटलं नाही; म्हणून पुस्तक पुढे वाचलं नाही.
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 2 Nov 2010 - 13:12 · उत्तर
तू आणि केव्हापासून अंडरस्टेटमेंट की काय म्हणतात ते करू लागलीस? की सडेतोड होण्याची भीती वाटली? :)
हाहाहाहा... हे बाकी भारी. पण इतकं काही होत नाही. एकदा मनोरुग्णेचं ठरवल्यानंतर काचा कशाला फोडायच्या? पुस्तक फाडून बाजूला टाकायचं ना! :) आहे का तुझ्याकडं अजून ते? हिवाळा आहे. विद्यापीठात थंडी असते. शेकोटी करता येईल.
ते पुस्तक मी वाचलं एकदा. पूर्ण वाचलं. एकूण तो पोस्ट मॉडर्निझ्मचा प्रकार मला तरी झेपला नाही. म्हणजे त्यात तिला नेमकं काय सांगायचं आहे ते कळलंच नाही. मग त्यानंतर एकदा मेघनाचं एक व्याख्यान पुणे विद्यापीठात ऐकलं. तिथं बहुदा तिच्यातली ती कथाकार व्याख्यान देत असावी. अगदी 'हंस अकेला' वगैरे कळतं तसं व्याख्यान होतं ते.
मग लक्षात आलं की, नातिचरामी आपल्यासाठी नाहीच. ते पुस्तक तेव्हापासून तसंच घरी ठेवलंय.
साला, 'ब्र' ही स्वयंसेवी संस्थांची अहवालभरती म्हणता येण्याइतकी कळली. 'बाकी शून्य' "अगदी, अगदी" म्हणता येण्याइतकी कळली. 'नातिचरामी' काहीही कळली नाही. एवढं कळलं की, त्यात वळणावळणानं ती बाई काही कथा सांगतेय - जे बहुदा एक गाऱ्हाणं आहे. पुरूषी व्यवस्थेविरोधातलं. त्यातल्या भावनांशी, मतांशी सहमत होऊ शकतो म्हणा. पण कथा पूर्ण कळली असती तर अधिक उत्तम झालं असतं.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Tue, 2 Nov 2010 - 14:00 · उत्तर
नातिचरामी मला पण बिलकुल झेपले नाही बुवा..
अदिती पेक्षा २०-२५ पाने जास्त वाचली असवीत...
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Tue, 2 Nov 2010 - 18:58 · उत्तर
श्रावण, निखिल, मला ॥नातिचरामि॥बद्दल हे समजलं नाही की ही बाई आता नवर्यापासून वेगळी झाली आहे, निदान तसं म्हणते तरी आहे तरी पुन्हा त्याच्या आणि सहजीवनाबद्दलच का बोलत्ये? "Move on" हे तिला का कळू नये? बरं नाही कळत तर उगाच असा समंजसपणाचा साहित्यिक वगैरे बुरखा कशाला??
'ब्र'मात्र मला आवडली. स्वतःचं अस्तित्त्व, स्वतःचे विचार, स्वतःचं काहीच नसणारी घटस्फोटीता काहीतरी करायचं म्हणून "बिच्चार्या" गरीब बायांच्या गोष्टींनी अहवाल भरायला लागते आणि त्यातून स्वतःचंच व्यक्तीमत्व बनवत जाते. पुस्तक संपताना एक घटस्फोटीता गायब होऊन तिथे एक स्वतंत्र विचारांची व्यक्ती दिसायला लागते. आणि मधल्या पानांमधे कविता महाजनांनी केलेला अभ्यास दिसतो. उगाच काहीतरी "एक कप माझ्याकडे पहातोय"* असली काहीतरी बिन्डोक विधानं वाचावी लागत नाहीत. 'ब्र' थोडी लहान (आहे त्याच्या साधारण ६०%) केली असती तर जास्त परिणामकारक झाली असती असं माझं मत आहे, पण तरीही कविता महाजनांनी केलेले कष्ट आणि त्यांचं अभ्यासपूर्ण लिखाणच आठवतं.
श्रावण, शेकोटी केली नाही कारण नशीबाने ॥नातिचरामि॥ ग्रंथालयातून घेतलेलं होतं. कादंबर्या मी माझ्या पैशाने अजूनपर्यंत विकत घेतलेल्या नाहीत आणि मला त्याचा प्रचंड अभिमान/गर्व/अहंकार आहे. त्यातही सत्यकथेवर आधारित, अभ्यासपूर्ण कादंबर्यांचा अपवाद करण्याचा विचार मी नक्कीच करेन आणि 'ब्र' विकतही घेईन, पण ॥नातिचरामि॥, सात सक्कं त्रेचाळीस वगैरेंची पानं डोळ्याखालून गेली की हा अभिमान/गर्व/अभिमान वाढीला लागतो.
*हे उगाच माझं इंप्रेशन पुस्तक कडेला टाकल्यानंतर दोन महिन्यांनी राहिलेलं!
यशोधरा
यशोधरा · Tue, 2 Nov 2010 - 13:25
सागर, आता तुला नातिचरामी भेट म्हणूनच घे माझ्याकडून! :D
वाचताना जमल्यास येंजॉय माडी! :P
सागर
सागर · Tue, 2 Nov 2010 - 13:27 · उत्तर
वाचल्यावरच माझे मत सांगेन.पाहू काही कळते का ते. आतातर मी हे पुस्तक नक्की वाचणार आहे :)
फुल्टू एन्जॉय माडी करत ;)
कैवल्य
कैवल्य · Tue, 2 Nov 2010 - 13:27
किती ताप करुन घेता रे डोक्याला.
मी गेल्या शनिवारीच मस्तपैकी ४ पुस्तकं आणली. सध्या एकेक पान खाणं चालू आहे.
सगळी सु.शि. :)
यशोधरा
यशोधरा · Tue, 2 Nov 2010 - 13:30 · उत्तर
मला कधी देतोस? :D
सागर
सागर · Tue, 2 Nov 2010 - 13:31 · उत्तर
मी पण सुशिची १० पुस्तके पुढच्या आठवड्यात मागवणार आहे
आजच माझी यादी दिली आहे. बघू किती मिळतात त्यातली ते :)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 2 Nov 2010 - 13:40 · उत्तर
ओ,
हा काही ताप नाही. स्वातंत्र्य आहे ते आमचं. काय म्हणणं आहे? ;)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Tue, 2 Nov 2010 - 13:58 · उत्तर
कैवल्य राव
आम्हाला जरा सुशिंची ओळख करुन देता का???
म्हणजे या कादंबर्यांचा सार वैगेरे काही..
कैवल्य
कैवल्य · Tue, 2 Nov 2010 - 14:01 · उत्तर
पाचर...मारलीत पाचर? :)
पाहुया, वेळ मिळाला की एका आवडत्या पुस्तकाचा परिचय करुन द्यावा असा मानस आहे.
कैवल्य
कैवल्य · Tue, 2 Nov 2010 - 13:56
@ यशो: घर आपलंच आहे. कधीही ये आणि वाच. ;)
@ सागरः दहाऽऽ???? कोणती कोणती रे? जाता-येता मिळतच नाहीये. ते आणि बरसात चांदण्यांची आउट ऑफ प्रिंट आहे म्हणे.
@मोडकः आय माय स्वारी! :D बाकी, ह्या विषयावर एकदा सविस्तर चर्चा करायची आहे आपल्याशी. ;)
सागर
सागर · Tue, 2 Nov 2010 - 14:01 · उत्तर
>>>> जाता-येता मिळतच नाहीये. ते आणि बरसात चांदण्यांची आउट ऑफ प्रिंट आहे म्हणे
या बाबतीत मी लकी आहे.
ही दोन्ही भन्नाट कॉमेडी पुस्तके माझ्याकडे आहेत
याबरोबरच लटकंती आणि मधुचंद्र (जरी ते सिरियस असले तरी) नक्की वाच भारी आहेत
सुहास शिरवळकर यांची पुढील १० पुस्तके मागवणार आहे. यादी रसिक साहित्यला ईमेल केली आहे.
चेक करुन सांगतील ते आज आणि उद्या पाठवतील :)
- सुन्न
- निमित्तमात्र
- मुक्ती
- रुपमती
- आक्रोश
- असीम
- असह्य
- समांतर (यावर सध्या एक सिरियल चालू आहे. म्हणून बाजारात रि-प्रिंट होऊन येते आहे :) )
- अंतिम
- कोसळ
कैवल्य
कैवल्य · Tue, 2 Nov 2010 - 14:06 · उत्तर
असं जळवू नये एखाद्याला. :(
बाप्पा, लटकंती आणि झूम तर झक्कासच. एकदम मजाच मजा.
रुपमतीही घ्यायचंय मला.
सागरु, काळंशार घेऊ का रे? व्हॉट्ट डू यु से? मी वाचलंय खरं, पण खुप वर्षं झाली आता..किमान १५ तरी नक्की.
सागर
सागर · Wed, 3 Nov 2010 - 10:23 · उत्तर
सुहास शिरवळकर ज्याला आवडतो त्याने नावाकडे बघू नये रे
काळंशार माझ्याकडे अजून नाहिये, पण मी वाचलेलं आहे. छान आहे ते पण.
नक्की घे.
बाकी सुचवायची असतील तर माझ्या संग्रहात सुशिंची पुढची पुस्तके मस्तच आहेत. नक्की घे
१. थरारक
२. सालम
३. अनुभव
४. गुणगुण
कैवल्य
कैवल्य · Wed, 3 Nov 2010 - 10:32 · उत्तर
आणखी कितीवेळा घेऊ? :)
मला प्राक्तनही आवडलं होतं. तेही घेणार आहे. काळंशार ह्या शनिवारी उचलतो.
तू संदेह (कथासंग्रह) वाचलंयस का? मस्त आहे.
यशोधरा
यशोधरा · Tue, 2 Nov 2010 - 14:19 · उत्तर
>>@ यशो: घर आपलंच आहे. कधीही ये आणि वाच.
मेराईच डायलाग मेरेकोईच?? बगून घील! :D
तुला पक्षीकोश हवयं ना? हॅ हॅ हॅ..
कैवल्य
कैवल्य · Tue, 2 Nov 2010 - 14:36 · उत्तर
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म.........
मला वाटतं ते तू नातिचरामी जसं सागरला देणार आहेस तसंच मला पक्षीकोश देणार होतीस..आठवतंय का?
हाहाहा!!! तुला कोणतं पुस्तक हवंय यशो? माझी वाचुन झालेली नाहीयेत पण तुला हवी असतील तर चारही देतो. :)
(एकदा पक्षीकोश पडु दे हातात..मग सांगतो.)
यशोधरा
यशोधरा · Tue, 2 Nov 2010 - 14:50 · उत्तर
तुला काहीही वाटेल बच्च्मजी, मला काहीही आठवत नाही :D
>(एकदा पक्षीकोश पडु दे हातात >> दशदिशांना वाटच वाट बघणे.
असो. अवांतर नको करायला धागा.
नीधप
नीधप · Wed, 10 Nov 2010 - 06:24
मी एवढ्यात विकत घेतलेली पुस्तके
यशोधरा
यशोधरा · Wed, 10 Nov 2010 - 06:30 · उत्तर
भास्कर चंदावरकरांचं वाद्यवेध आणि भारतीय संगीताची मूलतत्वे
ह्याबद्दल लिही जरा.
सागर
सागर · Wed, 10 Nov 2010 - 07:44
आदित्य - अरुण हेबळेकर (विज्ञान कादंबरी)
मौज प्रकाशन गृह
नभात हसरे तारे - डॉ.जयंत नारळीकर , सौ.मंगला नारळीकर आणि डॉ.अजित केंभावी (विज्ञानाविषयक)
राजहंस प्रकाशन
चूकभूल देणे घेणे - सुहास शिरवळकर (कादंबरी)
दिलीपराज प्रकाशन प्रा. लि.
कृष्णविवर - मोहन आपटे (विज्ञानाविषयक)
राजहंस प्रकाशन
आरागॉर्न
आरागॉर्न · Wed, 10 Nov 2010 - 07:46
मी मला दिवाळी भेट दिली. :)
आय, अझिमॉव्ह : अझिमॉव्हचे आत्मचरित्र!!! वाचनयादीतील क्रम तोडून पहिल्या क्रमांकावर जाणार असे दिसते आहे. :)
नॉर्वेजियन वुड : मुराकामीची नेहेमीपेक्षा हटके कादंबरी म्हणून उत्सुकता शिगेला पोचली आहे.