एवढ्यात तुम्ही कोणती पुस्तके विकत घेतली आहेत? भाग - ७

ऋषिकेश

मजकूर

भाग ६ दुसर्‍या पानावर जायला आला आहे त्यामुळे नवीन धागा सुरु करत आहे.

आपण अलिकडे कोणकोणती पुस्तके खरेदी केली आहेत त्यांची नावे , लेखक, व शक्य झाले तर किंमत व प्रकाशक वगैरे देणे इथे अपेक्षित आहे. त्याच बरोबर पुस्तकाची संक्षिप्त ओळख करून दिलीत तर अधिक चांगले.
या भागाची पुन्हा माझ्याकडून सुरूवात करतो.
कालच बुकगंगावरून ही पुस्तके मागवली:

१. गंधर्व -- बाळकृष्ण प्रभुदेसाई -- नंदनने मागे याबद्द्ल लिहिलं होतं (नेमका दुवा सपडत नाहीये.. मिळाला की धागा अद्ययावत करेन). तेव्हा फार विचार न करता नंदन वाक्यं प्रमाणं म्हणून घेऊन टाकलं ;)

२. त्या वर्षी -- शांता गोखले दशकातील दहा या धाग्यात इथे मणिकर्णीकाने केलेले वर्णन आणि त्याला मेघनाचा दुजोरा वाचून मागवले आहे.

३. किमया -- माधव आचवल: चित्रा यांनी यावर इथे जे काही सुंदर लिहिले आहे की कोणालाही पुस्तक घ्यावसं वाटेल

अभिप्राय

यशोधरा

यशोधरा · Tue, 19 Apr 2011 - 08:51

विकत नाही घेतलेलं अजून, पण वाचते आहे - Mafia queens of Mumbai. सुरुवात अत्यंत पकड घेणारी आहे - भाषा नेमकी आहे, फाफटपसारा नाही. कल्पनेबाहेरच्या सत्यकथा वाचताना अवाक् आणि थक्क व्हायला होतंय.

झालं वाचून. कल्पनातीत आहे, पण संग्रही ठेवावे का ह्याबाबत खात्री होत नाही.

वल्ली

वल्ली · Tue, 19 Apr 2011 - 13:02

आजच पुण्यात गेलो होतो. तिथे ही पुस्तके घेतली-

सातवाहनकालीन महाराष्ट्र - रा. श्री. मोरवंचीकर - प्रतिमा प्रकाशन- कि. ३५० रू. (सागर आणि माझ्या खरडींमध्ये याचे काही संदर्भ सापडतील)
युगंधर- शिवाजी सावंत - कॉंन्टीनेंटल प्रकाशन - कि. ४०० रू.
व्यासपर्व - दुर्गा भागवत - मौज प्रकाशन - किं. ८० रू.
आर यू अफ्रेड ऑफ द डार्क - सिडनेय शेल्डन - अनु. अनिल काळे - श्रीराम बुक एजन्सी- किं. २५० रू.

वरील सर्व पुस्तके एकंदरीत २०% सवलतीत मिळाली. अप्पा बळवंत चौकातील पाटील बुक एजन्सीकडून.

सागर

सागर · Wed, 20 Apr 2011 - 12:51 · उत्तर

सातवाहनकालीन महाराष्ट्र - रा. श्री. मोरवंचीकर

हे एकदम मस्त पुस्तक आहे.
असे ग्रंथ क्वचित लिहिले जातात :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Tue, 19 Apr 2011 - 13:22

गेल्या आठवड्यात पुण्याला गेले होते. पद्मगंधा प्रकाशनकडून थेट खरेदी केलेली पुस्तके (अर्थात २०% सवलतीत...)

  1. आ. ना. पेडणेकर यांच्या निवडक कथा - संपादक: विलास सारंग
  2. कविता आ. ना. पेडणेकरांच्या - संपादनः डॉ. अनंत देशमुख
  3. Death Be Not Proud - John Gunther ---- मरणाची तमा कुणाला? पुरुषोत्तम धाक्रस
  4. हेलन ऑफ ट्रॉय - जॉन एस्काईन ---- अनु. रेखा देशपांडे
  5. पिएर अ‍ॅंड जोन - गि. द. मोपांसा --- अनु. प्रल्हाद वडेर

सागर

सागर · Fri, 6 May 2011 - 13:56 · उत्तर

चित्रा,

हेलन ऑफ ट्रॉय वाचून झाले का?
झाले असल्यास तुझ्या सदाबहार शब्दांतून या पुस्तकाबद्दल ऐकायला आवडेल :)

ट्रॉय (त्यातही हेलन)हा माझा आवडता विषय आहे :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Fri, 6 May 2011 - 16:06 · उत्तर

सागर,
`हेलन ऑफ ट्रॉय' चा संदर्भ मला कुठे मिळाला सांगू? अगदी थेट नव्हे पण इनडायरेक्ट.....
`द रीडर' (अनु. अंबिका सरकार) ह्या पुस्तकात. मला मज्जाच वाटली. नुकतेच रीडर हातावेगळे केले होते (पुस्तक-परिचय लिहून) आणि हे पुस्तक हाती आले.
अजून वाचले नाहीये.
आपण पुस्तकवेडे असलो की एकातून दुसरे असे वाचन-संदर्भ मिळतच राहतात आणि आपण वाचतच रहातो......

सागर

सागर · Sat, 7 May 2011 - 09:58 · उत्तर

आपण पुस्तकवेडे असलो की एकातून दुसरे असे वाचन-संदर्भ मिळतच राहतात आणि आपण वाचतच रहातो.....

अगदी खरे आहे चित्रा.
संदर्भ मिळत जातात आणि एकसे बढकर एक पुस्तके आपल्याला मिळत जातात.
वाचनाचा आकंठ आनंद अनुभवणे हे एक वेगळ्याच प्रकारचे सुख आहे :)

रीडर अजून मी पण नाही वाचलेले. सवडीने नक्की वाचेन.

तुझे हेलन ऑफ ट्रॉय वाचून झाले की तुझ्या खुमासदार शैलीत एक सुंदर पुस्तक परिचय नक्की वाचायला मिळणार याची खात्री आहे :)

सागर

सागर · Fri, 6 May 2011 - 13:55

पुस्तके कायम स्वतःजवळ रहावीत आणि वाढती रहावीत म्हणून आज अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर खरेदी केली ;)

१.किमया - माधव आचवल
(आचवल मी वाचले नाहीत त्यामुळे किमयेपासून सुरुवात करतो आहे.हे झाले की मग जास्वंदकडे वळेन.)
२. लाट - हमीद दलवाई (देवेन्द्रच्या प्रश्नमंजुषेत या पुस्तकाचा उल्लेख आला असल्यामुळे घेतले आहे)

यशोधरा

यशोधरा · Fri, 6 May 2011 - 14:56 · उत्तर

लाट कसं आहे मला सांग सागर, तुझं वाचून झालं की.
माझ्याकडे लिस्ट झाली आहे घ्यायच्या पुस्तकांची. कधी घ्यायला मिळतात, कोणास ठाऊक.

सागर

सागर · Fri, 6 May 2011 - 15:04 · उत्तर

यशोधरा,

नक्की सांगेन.
तुझी यादी मला विरोपव :)

मला पण त्यातून खरेदीसाठी मोटिव्हेशन मिळेन ;)

यशोधरा

यशोधरा · Sun, 8 May 2011 - 10:14

ही पुस्तकं घ्यायच्या लिस्टीमधली नव्हेत. ही आज सापडली, त्यामुळे घेतली :)

गीतगोविंद - मूळ संहिता आणि भावानुवाद - आनंद साधले
परममित्र- जयवंत दळवी - व्यक्तीचित्रं
कुमार गम्धर्व- मुक्काम वाशी - संकलन आणि संस्करण - मो वि भाटवडेकर
बंध- अनुबंध - कमल पाध्ये - आत्मचरित्र
मर्ढेकरांची कविता - बा सी मर्ढेकर
रामनगरी- राम नगरकर
शुभ्र काही जीवघेणे - अंबरिष मिश्र

आता एकदा लिस्टपण घासून पुसून तयार करायला हवी. सागर, पाठवते तुला.

वल्ली

वल्ली · Sun, 8 May 2011 - 11:54 · उत्तर

एकदम दमदार खरेदी झालीय.
'शुभ्र काही जीवघेणे'नेमके कशावर आहे?

यशोधरा

यशोधरा · Sun, 8 May 2011 - 12:48 · उत्तर

धन्यवाद वल्ली. हो, पुस्तकं घरी आणताना खूप बरं वाटलं :)

शुभ्र काही जीवघेणे हे खरंतर दिवाळी अंकांनिमित केलेलं लेखन अहे. अक्षरमध्ये छापून आलेले काही लेख ह्या पुस्तकात समाविष्ट आहेत. आपल्या अंगभूत कलागुणांनी ज्यांनी रसिकांचं भावविश्व सतत पालवलं, अशा काही दिग्गज कलावंताची, अत्यंत मनोज्ञ अशी रेखाटलेली शब्दचित्रं ह्या पुस्तकात सापडतील. शब्द, सूर आणि ताल ह्यांवर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे, त्या सर्वांना लेखकाच्या लेखणीला काय काय सांगू आणि किती सांगू, असं झाल्याचं नक्की जाणवेल आणि उमजेल. :)

अति चिकित्सक लोकांसाठीचं मात्र हे पुस्तक कदाचित नाही.

माझ्या मते तरी संग्राह्य असं पुस्तक.

सागर

सागर · Sun, 8 May 2011 - 13:07 · उत्तर

यशोधरा,

अगदी हटके खरेदी झाली तुझी.

तुझ्या मोठ्या यादीची वाट बघतो आहे :)

रामनगरी या यादीत बघून मी हळहळलो...
हे सुंदर पुस्तक अजून माझ्या संग्रहात कसे नाही आले ब्वॉ.. :( ... आता घेईन :)

तुझ्या यादीत आनंद साधले यांचे पुस्तक पाहून सुखावलो.
आनंद साधले यांच्या सोनेरी पान मालिकेने मला वेड लावले होते. गीतगोविंद हे ही पुस्तक सुंदर असणार याची खात्री आहे.
हेही पुस्तक मी घेणारच आहे पुढच्या खरेदीत :)

यशोधरा

यशोधरा · Sun, 8 May 2011 - 13:24 · उत्तर

आज रसिक्मध्ये गीतगोविंदच्या केवळ दोन कॉप्या होत्या, कव्हरांचा पत्ता नाही. त्यातल्या त्यात बरी प्रत घेऊन आले. किंम्मत? रुपये बावीस फक्त. :) ६६ मध्ये पहिली आवृत्ती आलेली दिसते आणि ८३ मध्ये दुसरी, जी माझ्याकडे आहे. दीनानाथ दलाल ह्यांना अर्पणपत्रिका आहे.

सागर

सागर · Sun, 8 May 2011 - 13:40 · उत्तर

यशोधरा,

एक रिक्वेस्ट आहे. पुन्हा गेलीस तर प्लीज माझ्यासाठी ती दुसरी कॉपी घेऊन ठेव...
आनंद साधलेंचे पुस्तक मिळणे हेच दुर्मिळ आहे. आणि मला ते पुस्तक हवे आहे :)

यशोधरा

यशोधरा · Sun, 8 May 2011 - 14:04 · उत्तर

नक्की सागर. पुन्हा गेले की नक्कीच बघेन मिळते का, आणि असले तर घेऊन ठेवते.

सागर

सागर · Mon, 16 May 2011 - 14:58

वंशवृक्षच्या वेच्यामुळे पुन्हा एकदा वंशवृक्ष वाचावे असे तीव्रतेने वाटू लागले आहे.
मग वंक्षवृक्ष घेणारच आहे तर इतरही मैलाचा दगड असलेली पुस्तके घ्याविशी वाटले

ही आजची खरेदी
वंशवृक्ष - एस एल भैरप्पा - अनु. उमा कुलकर्णी - मेहता पब्लिशिंग हाऊस
एल्गार - सुरेश भट (कविता संग्रह) - साहित्य प्रसार केंद्र
बॅरिस्टरचं कार्टं - हिम्मतराव बावस्कर - मॅजेस्टीक प्रकाशन
पारध - अशोक जैन - राजहंस प्रकाशन - पुन्हा श्रामोच्या वेच्यामुळे
अंताजीची बखर - नंदा खरे - मनोविकास प्रकाशन
बखर अंतकाळाची - नंदा खरे - मनोविकास प्रकाशन

shop.mimarathi.net वरुन घेतली.
छान सेवा मिळाली. २० % सवलत + वाजवी शिपिंग.
अलिकडेच त्यांनी दर दोन दिवसाआड एसएमएस वर ३० ते ४० % सवलतीने २ पुस्तके आणि फ्री शिपिंग ने देण्याचा नवीन उपक्रम सुरु केला आहे. या दुव्यावर अधिक माहिती मिळेल

वल्ली

वल्ली · Tue, 17 May 2011 - 07:07 · उत्तर

अफाट आहेस तू मित्रा. सतत दमदार खरेदी करत आहेस.

सागर

सागर · Tue, 17 May 2011 - 09:14 · उत्तर

मित्रा,

ही सुंदर पुस्तके घेण्याचा मोह कोणाला आवरणार नाही? ;)
मिळत होती म्हणून उचलली.
कारण नंदा खरेंची पुस्तके आऊट ऑफ प्रिन्ट झाली आहेत जवळ जवळ.
म्हटले नंतर न मिळण्यापेक्षा आताच उचलावी :)

एल्गार माझ्याकडून ३ वेळा पळवले गेले आहे :(
म्हणून ते पण मागवले

सागर

सागर · Wed, 18 May 2011 - 08:23 · उत्तर

माझं नशीब जोरावर असावं
एल्गार सोडून सगळी पुस्तके मिळत आहेत असे आत्ताच कळाले :)

एल्गार पण ते प्रयत्न करत आहेत मिळवण्याचा. मिळाले तर तेही पाठवतील.

वल्ली

वल्ली · Wed, 18 May 2011 - 09:37 · उत्तर

श्री.ना. पेंडश्यांची पण एल्गार नावाची कादंबरी आहे. ती त्यांची पहिली कादंबरी. साखरपेंडीचा रघू बेंद्रे व त्याचा मित्र कादर ह्या जीवाभावाच्या मित्रांमधील फाळणीच्या काळात झालेला दुरावा यात रेखाटला आहे. एक सुंदर कादंबरी.

सागर

सागर · Wed, 18 May 2011 - 10:27 · उत्तर

मित्रा,

याही पुस्तकाबद्दल ऐकून आहे. पण कधी वाचायचा योग नाही आला.
तू रेकमेंड केलेस म्हणजे कुछ तो होगा. नक्की वाचेन :)

वल्ली

वल्ली · Wed, 18 May 2011 - 11:25 · उत्तर

अरे नक्कीच घे.
उपलब्ध आहेच. शिवाय किंमत पण फक्त १०० रू.:)

सागर

सागर · Wed, 18 May 2011 - 11:54 · उत्तर

पुण्याच्या भेटीत नक्की बघेन हे पुस्तक :)

टण्या

टण्या · गुरुवार, 19 May 2011 - 16:22 · उत्तर

सागर, मी ह्या साइटवर शोधले पण नंदा खरेंचे एकही पुस्तक मला मिळाले नाही.. तुम्ही दुवा देउ शकाल काय? अंताजीची बखर मी अनेक वर्षांपासून शोधत आहे..

सागर

सागर · गुरुवार, 19 May 2011 - 19:05 · उत्तर

टण्याभाऊ,

या साईट वर सर्व पुस्तके अपलोड करायचे काम अजून चालू आहे असे त्या साईट च्या व्यवस्थापकांनी मला सांगितले होते. जी पुस्तके हवी आहेत आणि जी साईट वर नाहियेत, त्या पुस्तकांची ऑर्डर मी या संकेतस्थळाच्या व्यवस्थपकांना विरोपाद्वारे दिली होती.
सहज विचारले होते की ही पुस्तके आहेत का उपलब्ध. असल्यास मला घ्यायची आहेत
त्यांनी १ तासाच्या आत शोधाशोध करुन कोणती पुस्तके मिळताहेत ते सांगितले व डिस्काऊंटसकट किंमत देखील सांगितली होती. मी नेटबँकींग वापरुन पैसे ट्रान्सफर केले.
पैसे जमा झाल्यावर लगेच त्यांनी पुस्तके पाठवल्याचे डिटेल्स पण कळवले. :)

तुम्हाला काही पुस्तके हवी असल्यास आणि साईट वर नसतील तर त्यांना विरोप पाठवून विचारु शकता. किंवा मुख्य पानावर संपर्क करण्यासाठी फोन क्रमांक दिला आहे, त्यावर कॉल करुन विचारु शकता.

सागर

सागर · Sun, 22 May 2011 - 15:03 · उत्तर

टण्याभाऊ,

हा दुवा या संकेतस्थळावरचा

मी संकेतस्थळाच्या व्यवस्थापकांच्या निदर्शनास आणून दिल्यावर लगेच त्यांनी नंदा खरेंची पुस्तके अद्ययावत केली आहेत. आता खरेदी करु शकाल तुम्ही :)

३_१४ अदिती

३_१४ अदिती · Sun, 22 May 2011 - 18:21 · उत्तर

नंदा खरे यांचं 'बखर अंतकाळाची' अलिकडेच प्रकाशित झालं आहे. साधारण दीड महिन्यांपूर्वी पुण्यात अक्षरधारा दुकानातून स्वतः आणि मित्रासाठी म्हणून दोन प्रती घेतल्या होत्या. तीन आठवड्यांपूर्वी हेच पुस्तक तिथे मिळत नव्हतं. काल तिथे गेले होते तेव्हा 'अंताजीची बखर'च्या (पुन्हा) दोन प्रती घेतल्या (तीन हव्या होत्या, पण दोनच उपलब्ध होत्या). 'बखर'ची आणखी एक प्रत हवी होती, ती घेतली. (तेव्हा आणखी दोन उपलब्ध होत्या.)
'अक्षरधारा'मधे, छापील किंमतीवर रू१०० - ९९९ च्या खरेदीवर १०%, १०००-१९९९ वर १५% आणि त्यापुढे २०% सवलत मिळते.

दीडेक महिन्यांपूर्वी अत्रे सभागृहातल्या रोहन प्रकाशनाच्या प्रदर्शनात नंदा खरेंचं 'कहाणी माणूसप्राण्याची' मिळालं. (आता तिथे 'गार्डन'चा सेल सुरू आहे.)

आप्पा बळवंत चौकातल्या 'परेश' किंवा 'रसिक'पैकी एका दुकानात नंदा खरेंचंच 'नांगरल्याविण भुई' मिळालं. 'परेश'मधे छापील किंमतीवर काहीही सवलत मिळाली नाही.

मिहिर

मिहिर · Wed, 18 May 2011 - 08:49

प्रकाश नारायण संतांची 'वनवास' आणि 'पंखा' ही विकत घेऊन मॅडसारखी वाचून काढली. पंखाच झालोय मी या पुस्तकांचा. 'शारदा संगीत' पण घेईन आता.
ना. सं. इनामदारांचे संकीर्ण लेख असलेले 'इनामदारी' घेतले. चांगले आहे.
चिं. वि. जोशींचे आधी फक्त 'ओसाडवाडीचे देव' वाचलेले. त्यांचे 'सोळा आणे' विकत घेतले. वाचतोय. ठीक वाटतंय पण तितकेही भारी वाटत नाही आहे.

वल्ली

वल्ली · Wed, 18 May 2011 - 09:40 · उत्तर

चिं. वि. जोशींची चिमणराव मालिकेतील सर्व पुस्तके वाचून काढा. उत्तम निखळ विनोदी पुस्तके आहेत. अर्थात त्यातील विनोद हा जुन्या काळातील असल्यामुळे कालबाह्य वाटू शकतो.

सागर

सागर · Wed, 18 May 2011 - 10:25 · उत्तर

चिमणराव म्हणजे निखळ आणि निर्भेळ करमणूक :)

मिहिर

मिहिर · गुरुवार, 19 May 2011 - 06:34 · उत्तर

शारदा संगीत पण विकत घेतले कालच. वाचतोय.
'मोडी शिका' ची ढवळे प्रकाशनाची पुस्तके घ्यायला अ. ब. चौकात गेलेलो. अनमोल, रसिक यांनी पहिला भाग मिळत नाही आता असे सांगितले. खरेच असे आहे का? शेवटी मी २ ते ५ हे भाग घेऊन आलो. टाइमपास म्हणून गोष्टी छान आहेत वाचायला.

सागर

सागर · गुरुवार, 19 May 2011 - 19:13 · उत्तर

मोडी शिकण्यासाठी सर्वात चांगले पुस्तक कोणी सुचवू शकेल का?

ज्याला मोडीवरच्या बेस्ट पुस्तकाची माहिती असेन त्यांनी कृपया सांगावे

यशोधरा

यशोधरा · Sat, 21 May 2011 - 12:26

राम शेवाळकरांची -

मोराचे पाय
प्रतिध्वनीचे मानस
त्रिदळ
रुचिभेट

ही चार पुस्तकं आणि व्यंकटेश माडगुळकरांचं - चित्रकथी.

पुस्तकं तर सुरेख अहेतच पण सगळी ५०% सवलतीतही मिळाली! :)

मिहिर

मिहिर · Sat, 21 May 2011 - 13:56 · उत्तर

५०% सवलत? कुठे मिळाली?

यशोधरा

यशोधरा · Sun, 22 May 2011 - 05:28 · उत्तर

एफ् सी रस्त्यावर एक दुकान आहे, सारस्वत बॅंकेपाशी. तिथे ५०% टक्के सवलत हा बोर्ड पाहिला. पुस्तके जुनी आहेत पण मस्त आहेत. मात्र चित्रकथी एकदम कोरे करकरीत मिळाले, कोर्‍या करकरीत पुस्तकाला जो मस्त वास असतो, त्यासकट :)

सागर

सागर · Sun, 22 May 2011 - 09:16 · उत्तर

जुनी पुस्तके म्हणजे कदाचित आऊट ऑफ प्रिंट झालेली पुस्तकेही कदाचित मिळू शकतील येथे.

वा यशोधरा, छान माहिती दिलीस. पुढच्या पुण्याच्या भेटीत या पुस्तकाच्या दुकानास नक्की भेट देईन

मिहिर

मिहिर · Fri, 27 May 2011 - 08:41

दुर्गा भागवतांचे 'व्यासपर्व' आणि 'मोडी शिका'चा पहिला भाग घेतला. यशोधरांनी सांगितलेल्या दुकानातून. मात्र नवी पुस्तके असल्याने दहा टक्के सवलत मिळाली.

सागर

सागर · Fri, 27 May 2011 - 08:58 · उत्तर

मिहिर,
मोडी शिका कोणाचे आहे?
गंगाधर महांबरे यांचेच मला माहिती होते...

विचारायचे कारण असे की एवढ्यात मोडीवर अनेक पुस्तके उपलब्ध आहेत. पण त्यातले सर्वात चांगले कोणते ते कळत नाहिये :(

वल्ली

वल्ली · Tue, 7 Jun 2011 - 05:46

परवा पुण्यात गेलो होतो. पॉप्युलर बुक हाउस च्या मान्सून सेलला. अंमळ निराशाच झाली. १५ ते २०% सवलत होती फक्त. येथल्या सदस्यांना ती कोठेही, कधीही मिळतेच. मराठी पुस्तके फारशी नव्हती.
तेथून घेतले ते
व्यंकटेश माडगुळकरांचे सत्तांतर.

सागर

सागर · Tue, 7 Jun 2011 - 06:04 · उत्तर

माङगूळकरांचे सत्तांतर मी पण खूप दिवस शोधत होतो. काही महिन्यांपूर्वीच पुनर्मुद्रीत झाले आणि लगेच उचलले.
सत्तांतर साठी व्यंकटेश माडगूळकरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे.
सत्तांतरचे वैशिष्ट्य हे आहे की यात एकही संवाद नाहीये. तरी ही छोटेखानी कादंबरी मनाचा ठाव घेते.
'सत्तांतर' चे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे माडगूळकरांची प्रदीर्घ आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना.
जंगलात स्वतः राहून केलेल्या निरिक्षणांतून साकारलेली 'सत्तांतर' ही कादंबरी.
वानरांमधील सत्तासंघर्ष अतिशय थरारक पद्धतीने वाचकासमोर उभे करण्यात माडगूळकर यशस्वी झाले आहेत. त्यामुळेच ही कादंबरी वाचनीय तर होतेच पण सिमेंटच्या जंगलात राहणार्‍या वाचकाला घनदाट झाडा-झुडुपांच्या जंगलातील एका वेगळ्या विश्वाची ओळख होते.
प्रत्येकाने वाचावी अशीच आहे 'सत्तांतर'.

वल्ली

वल्ली · Tue, 7 Jun 2011 - 07:19 · उत्तर

म्हणजे आता क्रमशः वाचून झाल्यावर सत्तांतरच घ्यावे लागणार हातात. :)

सागर

सागर · Tue, 7 Jun 2011 - 08:39 · उत्तर

सत्तांतर हातात घेतल्यावर वाचून पूर्ण होईल तेव्हाच तू खाली ठेवशील एवढी ओघवती भाषा आहे.
प्रस्तावना वाचताना मात्र तू टप्प्याटप्प्याने वाचू शकतोस, कारण त्यात माहिती बरीच आहे. पण माडगूळकरांनी अगदी सोप्या भाषेत ते लिहिले असल्यामुळे आकळायला जास्त जड जाऊ नये.

मिहिर

मिहिर · Fri, 1 Jul 2011 - 19:30

शिकस्त - ना. सं. इनामदार
नटसम्राट - वि. वा. शिरवाडकर
मुक्काम शांतिनिकेतन - पु. ल. देशपांडे
जन्मलेल्या प्रत्येकाला - प्रिया तेंडुलकर
Gone with the wind (english)
शिवाय The last lecture आणि Dady long legs ही दोन इंग्रजीतीलच भेट देण्यासाठी घेतली. छान वाटले एवढ्या खरेदीनंतर. :)

सागर

सागर · Mon, 4 Jul 2011 - 08:05 · उत्तर

सुंदर पुस्तके आहेत ही सर्व...
छान खरेदी केलीस मिहिर :)

शॉप.मीमराठी.नेट (shop.mimarathi.net) वर खूप छान सवलत मिळाली म्हणून पुढील पुस्तके घेतली
१. अरेबियन नाईट्स चे सर्व १६ खंड (मूळ लेखक सर रिचर्ड बर्टन , मराठी अनुवाद : गौरी देशपांडे)
२. अर्धी मुंबई - युनिक फीचर्स ( ५०% सवलतीने मिळाले)
३. श्रीयुत गंगाधर टिपरे - दिलिप प्रभावळकर( टीव्ही सिरियल मधील फोटोंमुळे ही आवृत्ती अतिशय सुंदर झाली आहे)
४. विज्ञानवेध - निरंजन घाटे (अनुक्रमणिका न छापलेले पुस्तक असूनही अतिशय माहितीपूर्ण आहे )

वल्ली

वल्ली · Mon, 4 Jul 2011 - 08:11 · उत्तर

मस्त खरेदी झाली रे मित्रा तुझी.

बाकी अरेबियन नाईट्स बरेच अश्लील आहे असे पुस्तक चाळतांना आढळले होते तसेच इतरांकडूनही ऐकण्यात आले होते. ते घरी सर्वांनी वाचण्यायोग्य आहे का? तसेच किंमत काय पडली त्याची?

सागर

सागर · Mon, 4 Jul 2011 - 08:43 · उत्तर

वल्ली मित्रा,

शृंगारीक वर्णने हा अरेबियन नाईट्स च्या काळात अविभाज्य भाग होता.
तरी पण गौरी देशपांडे यांनी अनुवाद अगदी सरस केला आहे.

मला आता त्यातले डिटेल्स आठवत नाहीत म्हणून सांगता येणार नाही.
आणि सर्व खंड पण मी इकडे बंगळूरात नाही मागवले. पुण्याच्या घरच्या पत्त्यावर मागवले होते, त्यामुळे माझा शिपिंग खर्च वाचला आणि १५०० रुपयांत सर्व खंड मिळाले. पुण्यात आल्यावरच तुला ते सर्व बघून सांगू शकेन
पण सर्वांनी वाचण्यायोग्य असावेत.

आता अरेबियन नाईट्स आऊट ऑफ प्रिंट आहेत. पण जुने खंड सर्व संच मिळाला म्हणून उचलले :)

आता अरेबियन नाईट्स छापून बाजारात आले तर एकेक जाडजूड खंड बराच महाग मिळेल आणि सगळा संच पण

वल्ली

वल्ली · Mon, 4 Jul 2011 - 08:54 · उत्तर

१५०० म्हणजे अगदीच स्वस्त मिळालेत रे. भाग्यवान आहेस. :)

चित्रा राजेन्द्र जोशी

चित्रा राजेन्द… · Mon, 4 Jul 2011 - 17:54 · उत्तर

वल्ली, सागर,
आमच्या एका ओळखीच्या डॉ. कडे ही पुस्तके आहेत आणि त्यांनी ती सर्वांत वरच्या कपाटांत ठेवून दिली आहेत, मुलाच्या हाती लागू नयेत म्हणून. पण ती वाचनीय आहेत असेही ते म्हणाले. शिवाय सागर म्हणतो त्याप्रमाणे गौरी देशपांडेंनी केलेला उत्तम अनुवाद हीदेखील त्याची जमेची बाजू आहे.
१९६४ साली गजानन बुक डेपोने प्रकाशित केलेले हे १६ खंड म्हणजे २० किलो वजनाची ३० पुस्तके आहेत अशी माहिती कळली.
मलादेखील ही पुस्तके घेण्याचा मोह पडला आहे. `गौरी देशपांडे'प्रेमींचे हे असेच व्हायचे!!!!!!!!

चर्चा प्रकार