- Log in to post comments
कुठल्याच एका अशा पुस्तकाचं परीक्षण / परिचय करून देण्यासाठी हा धागा नाही.
वाचनाचा किडा असलेले लोक सतत वाचतच असतात. त्यांतली सगळीच पुस्तकं त्यांना अतोनात आवडतात वा नावडतात असं नाही. काही पुस्तकांतून माहिती मिळते, काहींनी हलकंफुलकं मनोरंजन होतं, काही संग्रहात ठेवलीच पाहिजेत अशी खुणगाठ मनाशी बांधली जाते, काही चक्क ढापावीशी वाटतात.
तुम्ही 'अलीकडे' वाचलेल्या पुस्तकाबद्दल सर्वसाधारण माहिती (लेखक, प्रकाशक, किंमत, उपलब्धता इत्यादी) आणि त्याबद्दलचं तुमचं मत इथे लिहावं, अशी कल्पना आहे. (पुस्तक 'अलीकडचंच' म्हणजे नवीनच असलं पाहिजे असं काही नाही.) अर्थातच हा काही नियम वगैरे नव्हे. या धाग्यावर अलीकडची पुस्तकं एकत्रित सापडतील, आपल्या नजरेतून सुटली असतील तर मिळवून वाचता येतील इतकंच.
मी सुरुवात करते:
कर के देखो
संपा.: सदा डुम्बरे
समकालीन प्रकाशन
किंमत आठवत नाही.
जागतिकीकरणाच्या रेट्यात जगात मोठे बदल आणि तेही वेगानं होताहेत. या बदलांचे काही अनिष्ट परिणामही आहेत. आपल्यातले काही लोक या बदलांच्या नावानं बोटं मोडत न बसता पुढे सरसावून काही सकारात्मक कृती करताना दिसतात. उदाहरणार्थ गडचिरोलीत सामाजिक आरोग्यासंबंधी काम करणारे अभय बंग किंवा शेतकर्यांच्या प्रश्नांबद्दल सातत्यानं आणि अभ्यासपूर्ण लिहिणारे कळकळीचे पत्रकार पी. साईनाथ. अशा काही कृतिशील व्यक्तिमत्त्वांनी 'साप्ताहिक सकाळ'च्या वर्धापनदिनी केलेल्या भाषणांचा हा संग्रह आहे.
यांतली बरीचशी भाषणं अनुवादित आहेत. पण तरी त्यांत कुठे अनुवादाचा कृत्रिमपणा जाणवत नाही.
आजूबाजूच्या परिस्थितीच्या भीषणतेबद्दल आपल्याला अचूक माहिती पुरवणं आणि त्याच वेळी 'आपणही यात काही बदल घडवून आणू शकतो' असा आशावाद पुरवणं - ही या भाषणांची खासियत.
नीलची शाळा- समरहिल
लेखकः ए. एस. नील.
अनुवादकः आठवत नाही. दोघींपैकी एक बहुधा सुजाता देशमुख आहेत. पण चूकभूल देणे घेणे
(बहुतेक) राजहंस प्रकाशन
मुलांवर कुठल्याही प्रकारचा दबाव न आणता, त्यांना कठोर वेळापत्रकात न बांधता शिक्षणाचा काहीसा व्यवहाराच्या चौकटीबाहेरचा प्रयोग करणारी शाळा 'नीलची शाळा'मधे आहे.
इंग्लंडमधल्या नील नावाच्या बालमानसोपचारतज्ज्ञानं काढलेली ही शाळा. या शाळेतली मुलं तासाला बसायचं की नाही, कुठल्या, किती वेळा हे सगळं स्वतःच ठरवतात. त्यांना शिव्या द्यायला बंदी नाही. तशीच शाळेच्या काचा फोडायलाही. पण या शाळेचे नियम कोणतेही बाह्य पदाधिकारी ठरवत नाहीत. शाळेतल्या लहानात लहान विद्यार्थ्यापासून ते शाळेचा चालक-मालक असलेल्या नीलपर्यंत सगळ्यांना मतदानाचा (सारख्याच वेटेजचा!) अधिकार देणारी सभा शाळेत नियमितपणे भरवली जाते, लोकशाही पद्धतीप्रमाणे मतदान करून नियम ठरवले जातात आणि हीच सभा नियमभंगाबद्दल काय कारवाई करावी तेही ठरवते.
परीकथेतलं वाटावं इतकं हे अद्भुत आहे. मात्र त्याच्या मुळाशी असलेली नीलची अफाट सहनशीलता, प्रत्येक मूल चांगलंच असतं हा त्याचा ठाम विश्वास, आपल्या चुका कबूल करण्याची त्याची तयारी हे सारंही आहे.
पुस्तकाचा अनुवाद अगदी 'पाडस'इतका उच्च नाही, तरी खटकणाराही नाही.
अभिप्राय
स्वाती दिनेश
स्वाती दिनेश · Fri, 2 Jul 2010 - 11:24
नुकतेच वाचून संपवलेले..
सोन्याच्या धुराचे ठसके- डॉ. उज्ज्वला दळवी.
डॉ.दाढेंनी ह्या पुस्तकाची ओळख मिपावर टाकल्यापासून 'वाचायचे आहे'.. यादीत टाकले आणि अदितीला हमाली करायला लावून आणवले. 'वाचलेच पाहिजे' च्या यादीत हे पुस्तक टाकायला हरकत नाही..
स्वाती
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Wed, 7 Jul 2010 - 09:30 · उत्तर
खूप ऐकलं इतक्यात या पुस्तकाविषयी. आता वाचावंच लागेलसं दिसतंय.
वेदश्री
वेदश्री · Tue, 6 Jul 2010 - 17:08
परवाच्या खरेदीत कुसुमाग्रज मायबोली ग्रंथप्रदर्शनातून मनश्रीला घरी आणले आणि आज तीच वाचतेय. अर्धे झालेय वाचून. सहज साध्या शब्दात प्रामाणिक कथन विशेष भावलेय. :)
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Wed, 7 Jul 2010 - 09:39
बनी रुबेन यांनी लिहिलेलं प्राणचं चरित्र वाचलं इतक्यात. खूप काही नाही आवडलं. जंत्रीवजा आहे. माहिती पुष्कळ मिळते, पण मला तरी मजा नाही आली.
अविनाश बिनीवाले यांचं भाषाकारण नावाचं पुस्तक वाचलं. चांगलं होतं. पण ते त्रोटक होतं. एका सदराचं नंतर झालेलं पुस्तक म्हणजे याहून अपेक्षा नकोतच, म्हणा.
जगातल्या निरनिराळ्ञा भाषांचं जनव्यवहारातलं स्थान, राजकीय-सामाजिक-आर्थिक आणि ऐतिहासिक भूमिकांचा त्यांवर होणारा अपरिहार्य परिणाम, विशेषतः भारतीयांची लयाला गेलेली भाषिक अस्मिता, गैरसमज, अनास्था यांचं निरीक्षण हे पुस्तक करतं. भाषा हा आपल्या सांस्कृतिक सुबत्तेचा-प्रगतीचा बोलका मानदंड असतो याची चरचरून जाणीव हे पुस्तक वाचताना होते.
आता आचार्यांचं 'ध्वनितांचे केणें' मिळालं आहे. (काही महिन्यांपूर्वीच प्रकाशित झालेल्या पद्मगंधा प्रकाशनाच्या या पुस्तकासाठी मला ठाण्यातल्या मॅजेस्टिकात सुमारे ७ चकरा माराव्या लागल्या, हे इथे नम्रपणानं आणि खेदानं नमूद करते!) त्याच्या परीक्षणावरून ते 'व्यासपर्व'च्या जातकुळीचं वाटलं होतं. आता वाचल्यावर मला झेपलं / आवडलं / नावडलं ते लिहीनच.
स्वाती
स्वाती · Wed, 7 Jul 2010 - 10:16
काल गोनीदांच तांबडफुटी वाचले. आधी त्रीपदी वाचले. आता त्यांची सगळी पुस्तक मिळवुन वाचुन काढली पाहिजेत.
सतिश देवकरे
सतिश देवकरे · Fri, 9 Jul 2010 - 06:59 · उत्तर
हे पुस्तक मी वाचन्यास हरकर नाही ना?
आपण मिलि॑द बोकील या॑च शाळा हे पुस्तक वाचाव ही विन॑ती.
व आपली प्रतिक्रिया कळ्वावी.
दिपक
दिपक · Wed, 7 Jul 2010 - 10:20
शंकर पाटलांचे ’वळीव’ वाचतोय. पहिल्या तिनही कथा आवडल्या. पहिल्या कथेत केलेले पावसाचे वर्णन क्लास.

मस्त कलंदर
मस्त कलंदर · Wed, 7 Jul 2010 - 11:44 · उत्तर
शाळेत वळीव ही कथा होती... पायाळू तात्या, कडाडणार्या विजा आणि पायाळू माणसाला विजेचे भय असते म्हणून चिंतेनं ग्रासलेली तात्यांची बायको... तशा पावसात ती पुतण्याला तांब्याची अंगठी घेऊन नवर्याकडे पाठवते....
चिंचेचं झाड... म्हातारा कडुनिंब... पावसामुळे गदमदतं वातावरण... चार पानांचीच कथा पण त्यात निसर्गाचे, मानवी स्वभावाचे आणि परस्पर प्रेमाचे किती कंगोरे तिने उलगडून दाखवावे, याला मितीच नाही.... शंकर पाटलांच्या अपतिम कथांपैकी एक!!!
वाचक
वाचक · Wed, 7 Jul 2010 - 12:22
वाचतोय - त्यांच्या 'सति' ने झपाटून टाकल्यावर. अप्रतिम पुस्तक आहे, शिवाय तेंडुलकरांची प्रस्तावना.
लिहिन ह्याचा पण परिचय.
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 7 Jul 2010 - 13:08
मएक्सिकोपर्वच्या परिचयात अदितीने आठवणकरून दिलेलं दक्षिणरंग पुन्हा एकदा वाचायला घेतलं आहे. शिवाय इंग्रजीमधे नारायणन यांचे "द इंग्लिश टिचर" वाचतो आहे.. धमाल आहे
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Fri, 9 Jul 2010 - 06:04
रोमराज्य - १ (हू एल्स?! - मीना प्रभू)
अपेक्षेप्रमाणेच! इटली आणि रोमची भरमसाठ माहिती. त्याला ना आकार ना उकार. मायकेलँजेलो, कॅरॅव्हॅज्जिओ आणि लिओनार्दो दी विन्ची या चित्रकाराच्या काही चित्रांचे रसग्रहण आणि गुळगुळीत कागदांवरचे चित्रांचे रंगीत फोटो तेवढे लक्षात राहून जातात. काही मोजकेच प्रसंग लक्षात राहण्यासारखे. इटलीत काम करणारी, मुंबईत राहिल्याने मराठी बोलता येणारी एक नन लेखिकेला भेटते तो भाग हृद्य आहे. पण अपवादानं नियम सिद्ध होण्याइतपतच असल्या गोष्टी पुस्तकात सापडतात. बाकी निव्वळ जंत्री.
म्हणे युरोपियन संस्कृतीच्या तीन प्रमुख आधारस्तंभांवरच्या ट्रिओलॉजीतलं हे तिसरं पुस्तक. (कुणीतरी एक खवचट स्मायली काढा रे शोधून, प्लीज.) वर पुस्तकाच्या पानांचा अनपेक्षित गोंधळ झाल्यामुळे हे चौथं झालं आहे, याची निर्ढावून कबुली. शिवाय रोमराज्य २ आहेच. ते ट्रिओलॉजीतलं पाचवं असेल!
शिवाय 'मी आणखी कुठे फिरून यावं (म्हणजे त्याबद्दल पुस्तक छापावं) असं वाचकांना वाटतं आहे ते जरूर कळवा' अशी मखलाशी प्रास्ताविकात केलेली. आता बोला!
गर्ल्स ऑफ रियाध - (लेखिका आठवत नाही - अनुवाद स्नेहल जोशी) अनुवाद भिकार आहे. मीही त्यापेक्षा बरा केला असता असं मला वाटलं, म्हणजे पाहा.
ऋषिकेश
ऋषिकेश · Fri, 9 Jul 2010 - 08:50 · उत्तर
रोमराज्य (दोन्ही) आणि ग्रीकांजली ही अत्यंत कंटाळवाणी पुस्तकं आहेत. दक्षिणरंग, मेक्सिकोपर्व, माझं लंडन,तुर्कनामा, चीनी माती, इजिप्तायन ही मला आवडलेली पुस्तकं अर्थात उतरत्या क्रमाने :)
गुंडोपंत
गुंडोपंत · Fri, 9 Jul 2010 - 08:55 · उत्तर
ग्रीकांजली मला तर बरे वाटले होते. ऐतिहासिक माहितीपण बरी आहे मात्र वैयक्तीक अनुभव(च) जास्त असल्याने तसे रटाळ वाटू शकते बॉ.
चीनीमाती भंपक आहे लोन्ली प्लॅनेट चायनाच्या पुस्तकाचे मराठी भाषांतर आहे नुसते!
आपला
गुंडोपंत
सतिश देवकरे
सतिश देवकरे · Fri, 9 Jul 2010 - 06:51
मी सधा प्र्.के. अत्रे या॑च कर्हेचे पाणी हे पुस्तक वाचत आहे.
वेदश्री
वेदश्री · Fri, 9 Jul 2010 - 07:27
रणजित देसाईंची 'गंधाली' वाचायला घेतलीय आज. त्यातली 'विराणी' वाचल्यावर त्यातील मेहरुन्निसा तर आवडली पण तिच्यापेक्षाही शेर अफगाण अगदी प्रचंड आवडलाय. पुढच्या 'असा रंगला विडा'च्या आधी थोडासा ब्रेक घेऊन हापिसचं काम करावं लागणार आहे. :( अर्थात आठवणीत शेर अफगाण आहे त्यामुळे वांदा नाय! ;-)
वेदश्री
वेदश्री · Fri, 9 Jul 2010 - 10:32 · उत्तर
सुरूवातीला कडाक्कड भांडून शेवटी रावरंभा निंबाळकराला शिरपेच आनंदानं उतरवायला भाग पाडेलसा प्रेमाचा विडा वसूलणार्या नजाकतदार माहेलकाला माझा मानाचा मुजरा! अशी कटाकटीची लढाई वाचायला भारी मजा येते.. त्यातही तिचा शेवट असा प्रेमळ झाला तर क्या केहने! जेवणाच्या सुटीतल्या जेवणानंतर तूफान रंगलाय विडा! आता फारसे काम नसल्याने 'तार छेडून' बघणार... :)
गुंडोपंत
गुंडोपंत · Fri, 9 Jul 2010 - 08:49
विंदा करंदीकरांचे मृद्गंध वाचले (परत). बरे आहे. पुस्तकाच्या ओळखीत त्याविषयी येथे लिहिले आहेच. (तेथे नाव मॄदगंध असे दिले आहे. कारण येथे ते भलतेच काही तरी दिसते आहे. :(
आपला
गुंडोपंत
नंदन
नंदन · Fri, 9 Jul 2010 - 22:30
'द बर्निंग सिक्रेट' ह्या स्टिफन झ्वायगच्या दीर्घकथेचा बा. भ. बोरकरांनी केलेला अनुवाद नुकताच वाचला. कथेचा जीव तसा छोटाच आहे, पण ओघाओघात येणारी निरीक्षणं मस्तच. बोरकरांनी पोर्तुगीज आणि इंग्रजी अनुवादांवरून केलेला मराठी अनुवादही उत्तम वठला आहे.
इंग्रजीत मोबी-डिक ही हर्मन मेलव्हिलची क्लासिक कादंबरी वाचली. वाचण्याच्या दृष्टीने हे पुस्तक तसं सोपं नाही, कारण बर्याचशा कादंबर्या जो ओळख - प्रश्न - उत्तर - अंत असा मार्ग चोखाळतात; तसं यात काही नाही. खरं तर, दोन पुस्तकांची सरमिसळ असावी असा कधी कधी संशय येतो - एक कॅप्टन एहाब आणि मोबी-डिक नावाच्या व्हेल यांच्यातल्या एकतर्फी द्वंद्वाचं कथानक आणि दुसरं नौकानयनाशी संबंधित (तत्कालीन) जवळजवळ सगळ्या गोष्टींची माहिती देणारा प्रबंध. ('एमटी आयव्हा मारू'मधली सागरी पार्श्वभूमी किती बेगडी आहे याचा (पुनः)प्रत्यय येतो). पण खरा कठीण भाग हा की, लेखकाला जे म्हणायचं आहे ते तत्कालीन (१८५० चा सुमार) वाचकवर्गाला रुचणार नाही हा अनुभव असल्याने मेलव्हिलने सांकेतिकतेचा आधार घेत मुद्दाम धूसर करून ठेवलं आहे. परिणामी ही कादंबरी लिहिल्या गेल्यानंतर जवळपास ८० वर्षांनी, जुन्या पत्रव्यवहाराचा आधार घेत, तिच्या या शैलीमागचं रहस्य प्रकाशात आलं.
मुक्तसुनीत
मुक्तसुनीत · Sat, 10 Jul 2010 - 01:03 · उत्तर
उत्तम प्रतिसाद.
लेखकाला जे म्हणायचं आहे ते तत्कालीन (१८५० चा सुमार) वाचकवर्गाला रुचणार नाही हा अनुभव असल्याने
म्हणजे नक्की काय म्हणायचे होते ?
आनंदयात्री
आनंदयात्री · Sun, 11 Jul 2010 - 14:40 · उत्तर
आयवा मारु आवडली नव्हती. सागरी पार्श्वभुमीबद्दल माहिती अशी काहिच नसल्याने ती बेगडी असावी असा फारसा अंदाज आला नाही, पण कादंबरी एकंदरीच कंटाळवाणी वाटली.
दीपाली
दीपाली · Tue, 13 Jul 2010 - 10:34
सध्या 'यश तुम्च्या हातात' हे पुस्तक वाचत आहे.हे पुस्तक म्हणजे 'यु कॅन विन' या जगप्रसिद्ध पुस्तकाचा मराठी अनुवाद.हे एक मार्गदर्शनपर पुस्तक आहे. यशाविषयी नुसती स्व्प्न बघुन चालत नाही.आपल स्वत:च सुप्त सामर्थ्य ओळ्खुन, त्याचा पुरेपुर वापर करुन निश्चित ट्प्प्यात कस यश मिळवायच याच मार्गदर्शन करणार हे पुस्तक आहे. अजुन तरी पुर्ण वाचुन झालेले नाहिए.वाचुन झाल्यावर डिटेल मधे सागेन.
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Fri, 16 Jul 2010 - 08:22
सध्या शांताराम मराठीतुन वाचतोय....
१४०० पानांचा ग्रंथ आहे, किंमत ९९० रुपये अर्थातच मला एवडी रक्कम या पुस्तकासाठी खर्च करावी लागली नाही याबद्दल देवाचे आभार मानतो. शांतारामच्या पेपरबॅक इंग्रजी मुळ पुस्तकामधे साधारण ९५० पाने आहेत, मराठी भाषांतरा मधे १४०० कसे झालेत हे कदाचीत पुर्ण पुस्तक वाचल्यावरच कळेल.
सध्या पुस्तक पुर्ण करायच्या मागे लागलो आहे पण साधारण ५००-६०० पाने वाचुन झाले तरी म्हणावी तशी पकड घेतलेली नाही. कदाचीत पुस्तकाचा सगळा कथासार आधिच माहिती असल्यामुळे असेल. पहिल्यांदा वाचणार्याला मात्र कथा ग्रिपिंग वाटत असणारच. परत एकदा मराठी आणि इंग्रजी मधे मी मुळ इंग्रजीला मत देईल. मुळ इंग्रजी पुस्तकात एक फॉरेनर मराठीतुन बोलतो याचे वेगळे पण मराठी अनुवादात अर्थातच जाणवत नाही
अजुन एक हे पुस्तक वाचण्यासाठी निवांत वेळ असेल तरच हातात घ्या आणि अजुन एक प्रेमळ सल्ला कोणाचे तरी ढापुन, लायब्रररीचेच घेउन वाचा.
टण्या
टण्या · Fri, 16 Jul 2010 - 12:51
निखील, शांताराम मला डेव्हिडच्या लेखनशैलीमुळेच प्रचंड आवडलं होतं.. त्याचं मराठी भाषांतर करणे खरेच अवघड आहे.. वाचून पुर्ण झाले की अभिप्राय टाकच..
मी सध्या धनंजक कीर लिखीत 'बाबासाहेब आंबेडकरांचे' चरित्र, 'कहाणी मानवप्राण्याची' हे नंदा खरेंचे आणि 'Riddles in Hinduism' हे बाबासाहेंबाचेच पुस्तक वाचतोय.
वेदश्री
वेदश्री · Sun, 18 Jul 2010 - 19:51
जीएंचे रमलखुणा वाचले आज. दिगम्भांनी सुचवले तर होतेच पण त्यांच्यामते त्यातील इस्किलार कथा त्यांच्यानुसार जीएंची बेस्टेस्ट कथा वाटली त्यांना. माझे मत विदूषकला असताना ही इस्किलार मध्येच कशी टपकली हे बघायला आज रमलखुणा घेतले खरे वाचायला परतीच्या प्रवासात.. पण दिगम्भा म्हणाले तेच खरे होते. अवाक् करून सोडणारी कथा वाटली मला इस्किलार. मी तर इतकी ट्रान्समध्ये गेले होते की चक्क बस लास्ट स्टॉपला जाऊन पोहोचली तरी मला पत्ताच नाही लागला! अर्धा-पाऊण तास पायपीट करत परत यावे लागले घरी.. पण चलता है! :) दिगम्भांशी लावलेल्या शाब्दीक पैजेत कधीच का जिंकत नाही मी, हे मला आजतागायत न सुटलेले कोडे आहे. :(
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 19 Jul 2010 - 06:48 · उत्तर
सहमत.. मी तसा जीएचा चाहता नसलो तरी काहि कथांसाठी त्यांना "हॅट्स ऑफ" द्यावेच लागते. इस्किलार म्हणजे तर मेरूमणी
वेदश्री
वेदश्री · Mon, 19 Jul 2010 - 10:31 · उत्तर
>इस्किलार म्हणजे तर मेरूमणी
म्हणजे तुला 'इस्किलार म्हणजे तर इस्कहार!' असे म्हणायचे आहे ना जीएंच्या 'इस्किलार' भाषेत? ;-) गंमत बघ.. त्यांनी दीर्घकथेला नाव इस्कहार न देता इस्किलार दिलेय! कथेचे नावच स्वतःत इतके बोलके आहे म्हणता कथा किती बोलकी असणार याचा आपण नुसता अंदाजच बांधत राहिलेला बरा! एकदाच अधाशासारखे वाचून संपवलेय हे पुस्तक पण पुरते पचण्यासाठी कितीदा रवंथ (म्हणजे पारायण!) करावा लागेल कोण जाणे!
यातली प्रवासी दीर्घकथा देखील दमदार आहे पण ती पहिली का ठेवली असावी याचा पत्ता दुसरी इस्किलार वाचल्यावरच लागतो!
दिगम्भांच्या मते जीएंचे पहिले ४ कथासंग्रह खूपच छान आहेत आणि ५वा ठीकठाक. पुढचे त्यांनी वाचलेले नसल्याने त्यांना माहिती नसणार. न समजल्यास समजावून सांगण्याची जबाबदारी त्यांची असे त्यांनी कबलल्यावरच मी धाडस केले जीए वाचायला घेण्याचे. :)
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 13 Oct 2010 - 07:14 · उत्तर
"....मी तसा जीएंचा चाहता नसलो तरी....!"
~~ या वाक्याबद्दल श्री.ऋषिकेश या व्यक्तीला पुढचा जन्म सुदान/सोमालियात मिळणार हे मी आत्ताच अधोरेखीत करतो. अन् त्यांना तिथे जायचे नसेल तर लागलीच पॉप्युलरकडून समग्र जी.ए. त्यांनी आणून तो वाचायला सुरुवात करावी, तेही रात्रीच्या समयी....भ्रमणध्वनी बंद करून..... (जी.ए. एकांतात वाचावे).
(आणि या 'वेदश्री' नावाच्या सदस्येला आज ना उद्या 'पद्मश्री' मिळो..... 'इस्किलार'च्या कौतुकाबद्दल !)
इन्द्रा
ऋषिकेश
ऋषिकेश · Wed, 13 Oct 2010 - 10:08 · उत्तर
वा वा वा! जी.ए.च्या अनेक भक्तांबरोबर वाद/चर्चा झाल्या आहेत पण इतकी छान शिक्षा कोणीच दिली नव्हती! :)
धन्यवाद इंद्रा! आता एकदा जमवतोच बैठक..
वल्ली
वल्ली · Mon, 19 Jul 2010 - 11:03
द सिमीऑन चेंबर-
मराठी अनुवाद- जयवंत चुनेकर
प्रकाशक-मेहता पब्लिशिंग हाउस
रटाळ रहस्यकथा आहे. फक्त कुठलेही घेतलेले पुस्तक अर्धवट वाचावयाचे नाही म्हणूनच केवळ जिद्दीने पुढे पुढे वाचतोय.
टण्या
टण्या · Mon, 19 Jul 2010 - 11:41
दिगम्भांच्या मते जीएंचे पहिले ४ कथासंग्रह खूपच छान आहेत आणि ५वा ठीकठाक. पुढचे त्यांनी वाचलेले नसल्याने त्यांना माहिती नसणार.
>>>
जीएंचे सर्व कथासंग्रह एक से एक आहेत.. अगदी ते गेल्यावर प्रकाशित झालेले 'माणसे अरभाट आणि चिल्लार' सुद्धा.. फक्त सोनपावले हा एकमेव फसलेला संग्रह (anthology) माझ्यामते.. आणि जीए गेल्यावर ह्या उरल्यासुरल्या कथा वेचायला नको होत्या.. कुसुमगुंजा जरी जीए गेल्यावरच प्रकाशित झाला असला तरी त्यातल्या ८०% कथा ह्या पूर्वप्रकाशित (नियतकालिकांमधून) होत्या.. ३च कथा ध्वनिफितींवरुन घेतलेल्या..
जीएंच्या कथेचा प्रवास जर तपासायचा असेल तर मात्र त्यांचे कथासंग्रह (खासकरुन कथांच्या) प्रकाशनाच्या क्रमाने वाचावेत.. बहुतकरुन तत्कालिन वास्तवात घडणार्या छोट्या पल्ल्यांच्या कथांपासून (निळासावळा इत्यादी) हळुहळु दीर्घपल्ल्याच्या रुपकात्मक कथांकडे झालेला त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे..
वेदश्री
वेदश्री · Mon, 19 Jul 2010 - 16:39 · उत्तर
>त्यांचे कथासंग्रह (खासकरुन कथांच्या) प्रकाशनाच्या क्रमाने वाचावेत..
कैच्याकैच विचारतेय असे होत नसेल तर हा क्रम सांगू शकाल का? मला आवडेल तुम्ही म्हणता त्या क्रमाने वाचायला आणि जीएंना समजून घ्यायचा प्रयत्न करायला.
टण्या
टण्या · Tue, 20 Jul 2010 - 07:44 · उत्तर
मला घरी जाऊन सगळे कथासंग्रह ओळीने बघितले पाहिजेत.. अर्थात बहुतेक सर्व कथासंग्रहातल्या कथा ह्या पुर्वी कुठल्या ना कुठल्या नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या आहेत.. त्यामुळे कथासंग्रहांचा प्रकाशनकाळ आणि कथांचा प्रसिद्धीकाळ ह्यात थोडा ओव्हरलॅप असण्याची शक्यता आहेच..
पहिले तीन कथासंग्रह बहुतेक:
निळासावळा
पारवा
हिरवे रावे
(पारवा हा जीएंचा एकमेव कथासंग्रह बहुदा ज्याचे नाव पाच अक्षरी नाही.. अथवा बाकी सर्व म्हणजे निळासावळा, हिरवे रावे, पिंगळावेळ, रमलखुणा, अमृतफळे, सांजशकून, काजळमाया ते जीए गेल्यानंतरचे सोनपाउले आणि कुसुमगुंजा, सर्व पाच अक्षरी शीर्षके आहेत)..
वेदश्री
वेदश्री · Tue, 20 Jul 2010 - 08:24 · उत्तर
कथासंग्रहांचा प्रकाशनकाळ शोधणे काही जिकीरीचे काम नाही, ते मलाही जमवता येईल पुस्तके बघून पण कथांच्या प्रकाशनकाळाबद्दलचा तुमचा कंस सोडवण्यासाठी माहिती मिळण्याचे काहीच साधन (मलातरी माहिती) नसल्याने तो सोडवून द्यायला मदत करायची विनंती केली होती. बघा जमल्यास... नाहीच झाले तर तुमच्या सूचनेनुसार कथासंग्रहांच्या प्रकाशनकाळानुरूप वाचेन. कथांमध्ये लिहिलेले तत्वज्ञान उत्तरोत्तर अधिकाधिक सुस्पष्ट आणि सखोल होत गेलेले असल्यास तसे वाचायला खूपच आवडेल.
कथासंग्रहांच्या नावांमधली समानता मस्तच दिसतेय.. आणि त्यात पारवाबद्दल म्हणाल तर अपवादाशिवाय नियम सिद्ध होत नाही म्हणे! :)
टण्या
टण्या · Wed, 21 Jul 2010 - 08:25 · उत्तर
जवळपास सर्व कथासंग्रहांमधून जर कथा पुर्वी नियतकालिकांमधून वगैरे प्रकाशित झाल्या असतील तर नियतकालिकाचे नाव आणि प्रकाशन वर्ष (व कधीकधी महिनादेखील) दिलेले असते. बरेचदा पहिल्या-दुसर्या पानावरच ओळीने दिलेले असते. किंवा प्रत्येक कथेच्या अंती दिलेले असते.
मी नुकतेच कुसुमगुंजा विकत घेतले. त्यात प्रकाशनवर्षे नाहीत :( काही शोधाशोध करायची असेल तर मग प्रकाशनवर्ष वगैरे नसेल की चिडचीड होते.
सतिश देवकरे
सतिश देवकरे · Tue, 20 Jul 2010 - 07:28
१. नव्या जुन्या लेखका॑चे फोटो कोणाजवळ उपलब्ध आहेत का?
२. पुस्तकाविषयी - वाचानाविषयी आधुनिक भि॑त्तीपत्रके कोणाजवळ आहेत का?
जसे - ग्र॑थ हेच गुरु !
वाचाल तर वाचाल!
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 20 Jul 2010 - 21:22
सध्या परवापासून युगांत वाचायला घेतलंय... काल काही वाचणं झालंच नाही. या आधी व्यासपर्व वाचलंय. दोघींनीही महाभारतातल्या लोकोत्तर व्यक्तिरेखा कशा आपल्यासारख्याच हाडामांसाच्या आहेत याबद्दल लिहिलंय. पण का कोण जाणे, व्यासपर्वानंतर युगांत तितकेसे मनाला रूचत नाही. एकच व्यक्तिरेखा दुर्गाबाईंनी लिहिली, आणि इरावतीबाईंनीही.. त्यातली दुर्गाबाईंचीच जास्त भावते. काही ठिकाणी दोघींच्या माहितीत तफावत पण जाणवतेय. उदा. दुर्गाबाई म्हणतात की कृष्णाला वारस नव्हता.. तर इरावतीबाई एके ठिकाणी कृष्णाचा नातू वज्र तर लगेच त्याच्याच पुढच्या उतार्यात कृष्णाचा पणतू वज्राला लढाईनंतर इंद्रप्रस्थ मिळाले असे लिहितात.. आता यात खरे कोणते मानायचे??? त्याचबरोबर इरावतीबाई धर्म हा विदुराचा मुलगा होता असे विधान करतात आणि त्याच्या पुष्ट्यर्थ काही दाखलेही देतात. हा संदर्भ प्रथमच वाचला आणि तोही माझे मन मानायला तयार नाही..
दोन्ही पुस्तके आता पुन्हा एकदा वाचून दोहोंबद्दल एक तौलनिक लेख लिहायचा मानस आहे.. ते अर्थातच टंकाळा नाही आला तर!!! :)
रोचीन
रोचीन · गुरुवार, 14 Oct 2010 - 13:11 · उत्तर
व्यासपर्व हे ह्र्दयापासून लिहिलेले आहे तर युगांत हे डोक्याने लिहिले आहे!!! एकात मानवी भावना जास्त प्रगट होते तर दुसर्यात फॅक्ट्स जास्त प्रगट होतात म्हणून व्यासपर्व जास्त भिड्ते युगांतपेक्षा!!ज्यांना तार्किक वा बॉद्धिक गोष्टी जास्त आवड्तात त्यांना युगांत पण आवडतं!! या दोन्हिवरचा तुमचा लेख वाचायला आवडेल!!!
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Tue, 20 Jul 2010 - 22:49
हुश्श!!! अखेर ते १४०० पानांचे पुस्तक शांताराम हातावेगळे झाले....
नेमाड्यांची अडगळ आपलं ती हिंदु आजच हातात पडली..
आता वाचायला सुरवात करत आहे..
ऑनलाईन रजिस्टर केलेली आवृत्ती पॉप्युलर ने प्रकाशनाच्या दोन चार दिवसात घरी पोहचवली हे बघुन बरे वाटले.
वेदश्री
वेदश्री · Sun, 25 Jul 2010 - 16:11
मी काल दिगम्भांच्या सुचवणीवरुन Flowers for Algernon हे पुस्तक वाचले Daniel Keyes यांनी लिहिलेले. पुस्तकात एकच दीर्घकथा आहे जी मनाला अतिशय चटका लावणारी वाटली मला. एका रिटार्डेड व्यक्तीला - चार्लीला इंटेलिजन्स वाढवण्यासाठीच्या प्रयोगात गिनीपीग म्हणून वापरले जाते. पूर्ण कथा आपल्यासमोर येते ती चार्लीने लिहिलेल्या त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट्समधून! तो प्रयोग काय? यशस्वी होतो का? चार्लीचे नंतर काय होते? हे सर्व मूळातूनच वाचण्यासारखे आहे.
आईने नुकतेच 'जल आक्रमिले' हे सुमेध वडावालांनी लिहिलेले पुस्तक वाचले. थोडेसे वाचल्यावर म्हणाली की पोहोण्याचे सगळे विक्रम तोडून गिनिज बुकात नाव काढणार्या या पोरीला खरंच मानावे लागेल, तिच्या पाठीवर दोन भाऊ असूनदेखील वडलांनी त्यांच्याकडे तितकेसे लक्ष न देता तिला जे प्रोत्साहन दिलेय तेदेखील दाद देण्याजोगे आहे. आज मात्र पुस्तक पूर्ण वाचून संपल्यावर म्हणाली की पोरीला धाकदपटशा करून तिच्याकडून हे सगळे करवून घेतल्यासारखे वाटले म्हणे तिच्या वडलांनी. प्रत्येक खाडी तिने पार केली तेव्हा प्रत्येकवेळी तिच्या जीवावर बेतले होते पण तरीही तिच्या वडलांनी तिला भरीला घालघालून एकामागे एक अशा सगळ्या खाड्या तिच्याकडून पार करवून घेतल्या. शिवाय सर्व खाड्या पार करून गिनिजबुकात नाव आल्यावरदेखील दोन शब्द कौतुकाचे न बोलता.. असल्या सर्टीफिकेट्सवर नोकर्या मिळत नसतात काही, असे तिला सुनावले तिच्या वडलांनी जे वाचून रडूच आले म्हणाली. :(
आता मी राग दरबारी घेतेय वाचायला टण्याने सुचवल्याप्रमाणे. :)
वेदश्री
वेदश्री · Mon, 9 Aug 2010 - 14:47
जीन वेब्स्टर यांनी लिहिलेले डॅडी लॉंग लेग्स वाचले. ठीकठाक आहे जास्त काही आवडले असे नाही.
नॉट अ पेनी मोअर नॉट अ पेनी लेसचे दुसरे पारायण केले. मागच्यावेळी सुटलेले बारकावे यावेळी हेरता आले त्यामुळे आणखीनच मजा आली.
सद्ध्या जीए वाचायला घेतलेय. रमलखुणा, निळासांवळा, पारवा वाचून झालेत.. आणि रक्तचंदन वाचतेय. कशी वाटली ही पुस्तकं? शब्दच नाहीत हे सांगायला! दिगम्भांच्या वाचनाबद्दलच्या बेसिक सूचनांनुसार वाचली म्हणूनच बहुतेक वाचता आली.. वाचल्यावर परत माझ्या भावविश्वात पुर्ववत येऊ शकले हेच मोठे अचिव्हमेंट वाटतेय. जास्त खोलात जाऊन खाचाखोचा वगैरे समजून घ्यायला बहुतेक पारायणे करावी लागतील.. आणि ती जरूर करणार.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 9 Aug 2010 - 21:06
वेलकम टू फिनलंड - मंगला गोगटे वाचले.. फार छान आहे. फिनिश व्यक्तींच्या सोबत देशाचा परिचय करून दिला आहे. मिळाल्यास जरूर वाचा
या शिवाय अपंग नव्हे अभंग मी! पुस्तक वाचले. अनेक शरिराने अपंग व्यक्तींच्या अभंग कर्तृत्त्वाच्या कहाण्यंचं छान संकलन आहे.. काही गोष्टी तर डोळ्यात पाणी आणणार्या आहेत.
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 16 Aug 2010 - 06:52
मागे अदितीने परिचय करून दिलेले, वीणा गवाणकरांचे लीझ माइट्नर वाचतोय. तुफान पुस्तक आहे. शिवाय प्रकाशवाटा वाचून संपवलं त्यावर वेगळं लिहू का इथे लिहू विचार करतोय
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 17 Aug 2010 - 14:50
लीझ माईट्नर वाचून संपलं!!! कसलं गारूड केलंय त्या पुस्तकाने.. एकदम मस्त!! सध्या माझं वाचनाचं नशीब फळफळलंय.. बरीच पुस्तकं पेंडिंग आहेत
लीझ माईट्नर (लायब्ररी) -- आजच झालं आता बदलेन
आहे की नाही मज्जा :P
वेदश्री
वेदश्री · Tue, 17 Aug 2010 - 17:24 · उत्तर
>Many lives many master (आज ऑफीसच्या लायब्ररीत दिसलं.. past life therapy वरचं सायकोलॉजिकल थ्रिलर आहे)
सायाकोलॉजिकल थ्रिलर हा नवाच प्रकार ऐकतेय. थ्रिलर म्हटले की ऊगाच कान/डोळे टवकारले जातात माझे. वाचून झालं की सांगशील आठवणीने की कसे वाटले ते.
>आहे की नाही मज्जा
तर! तर! आहेच की एका माणसाची मज्जा... :)
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 14 Sep 2010 - 06:33 · उत्तर
Many lives many master एकदम फाल्तु पुस्तक आहे (मला वाटले..) ज्यांना लेखनात थोडातरी तर्क हवा असतो त्यांनी ह्याच्या वाटेला जाऊ नये
वल्ली
वल्ली · Tue, 17 Aug 2010 - 11:36
आर्थर हेलीचे 'मनिचेंजर्स' वाचून संपवले. अनुवाद-अशोक पाध्ये, प्रकाशन-उत्कर्ष बुक सर्व्हिस
'बँक' यासारख्या रूक्ष विषयावरील अतिशय रोचक कादंबरी.
आता विश्वास पाटलांचे 'पानिपत' काढून ठेवले आहे.
नंतरही बरीच पुस्तके रांगेने उभी आहेत.
डिसेप्शन पॉईंट, वन शॉट, क्रायसिस, द अॅटर्नी, कादंबरीमय शिवकाल, शाळा व अजूनही बरीच....
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Tue, 17 Aug 2010 - 13:45
परवा रविवारी बिकांच्या घरून ढापलेले रणजित देसाईंचे राजा रविवर्मा आताच संपले. थोडेफार टिपिकल रणजित छापाचे वाटले मला ते. राजा रविवर्माची ओळख करून देण्यासाठी पुस्तक पुरेसे आहे.. त्यांनी प्रस्तावनेत खूप ठिकाणी फिरून हे पुस्तक लिहिण्यासाठी पुष्कळ अभ्यास केला असे म्हटलेय, तरी मला त्यात नाट्यमयता जास्त वाटली.
आता श्रामोंचे वनवास ढापायचेय. वेदश्री, मोडकांना माझ्या घरून कोण कोण पुस्तके ढापू शकते ते माहित आहे. त्यामुळे पुस्तक तेच परतही मिळवतील!!! :)
वेदश्री
वेदश्री · Tue, 17 Aug 2010 - 17:55 · उत्तर
>वेदश्री, मोडकांना माझ्या घरून कोण कोण पुस्तके ढापू शकते ते माहित आहे. त्यामुळे पुस्तक तेच परतही मिळवतील!!!
योग्य हातात पुस्तक आहे म्हटल्यास 'चला, पुस्तकाची काळजी घेतली जाण्याची परस्पर सोय झाली!' असा सुटकेचा निश्वास टाकून एखादवेळी पुस्तक परत मिळवण्याची उचापत करण्याच्या भानगडीतही पडणार नाही तो! अगदी धन्य असावा तो त्या बाबतीत, असा माझा कयास आहे!!! :P
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 17 Aug 2010 - 18:07 · उत्तर
हाहाहाहा.. हरकत नाही!
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Tue, 17 Aug 2010 - 17:49
'हिंदू - जगण्याची समृद्ध अडगळ' वाचतोय. अद्याप मजा नाही!