- Log in to post comments
आपल्याला आवडलेली पुस्तके म्हणजे आपले सोबतीच. असे हे जीवश्चकंठश्च सोबती हक्काने आपल्याच घरी रहावेत यासाठी आपण काय काय नाही करत? या सोबत्यांची योग्य ती बडदास्त ठेवणे क्रमप्राप्तच ठरते की मग. त्यांची काळजी घेण्यात काही मला नीटसे न उलगडलेले प्रश्न आहेत. या प्रश्नांची उत्तरं कोणाला मिळाली असल्यास त्यांनी मदत करावी अथवा कोणाला पुस्तकांची काळजी घेण्याच्या संदर्भाने याहून वेगळे प्रश्न पडलेले असल्यास त्यांना ते मांडण्यासाठी जागा करून देणे या उद्देशाने ही चर्चा काढते आहे...
मला पडलेले प्रश्न -
१. पुस्तकांना कव्हर कशाचे आणि कसे घालावे?
- पुस्तकाचे आयुष्य वाढण्यासाठी कव्हर घालणे जरुरीच असले तरी वर्तमानपत्राचे कव्हर घातले की कव्हरवरील चित्र नयनमनोहर असल्यास दिसत नाही. पुस्तकांच्या रांगेतून हवे ते पुस्तक शोधण्यासदेखील त्रास होतो. शिवाय २-३ वर्षे झाली की त्या वर्तमानपत्रावरील अक्षरे पुस्तकावर उमटलेली दिसतात (याचा मला अत्यंत राग येतो.). प्लॅस्टीकचे कव्हर (पुर्वी विकत मिळायचे, अजुनही मिळतात की नाही कोण जाणे) घातले तर त्याला स्टेपल करावे लागते जे पुस्तकाला भोक पाडते त्यामुळे मला अजिबात आवडत नाही. तुमचा काय अनुभव आहे?
२. पुस्तकं कशी रचावीत?
- पुस्तके उभी ठेवल्यास एका कप्प्यात जास्त मावतात आणि सहजी काढतादेखील येतात पण पुस्तकांची अंगभूत कव्हर्स जनरली कडक नसल्याने ती उभी रचून ठेवल्यास त्यांची पाने मुडपतात. :(
३. पुस्तकांना कीड वगैरे लागू नये म्हणून काय करावे?
- जसे आपण कपड्यांच्या कपाटात डांबराच्या गोळ्या ठेवतो कपड्यांना कीड वगैरे लागू नये आणि कप्प्यात वासही ठीकठाक रहावा म्हणून.. तसे पुस्तकांबद्दल काय करावे? माझ्याकडे अजून हा प्रश्न काही आलेला नाही पण येऊ नये म्हणून काय खबरदारी घेता येईल ते बघतेय.
अभिप्राय
ऋषिकेश
ऋषिकेश · Sun, 27 Jun 2010 - 14:10
चांगला धागा इतरांची मते/सुचवण्या वाचण्यास उत्सूक आहे.
माझे दोन पैसे:
१. मी कव्हर घालत नाहि की काहि विषेश काळजी घेत नाहि. पुस्तक वाचताना पाने मुडपणे, पुस्तक मध्यातून मुडपणे, एका हातात पकडणे, मधे वाचनखूण म्हणून पीस/पुठ्ठा न घालणे, पुस्तकांत फोटो / फुले न ठेवणे (माझ्या एका मित्राच्या आईने त्यांच्याकडील ज्ञानेश्वरीत फुले ठेवली होती, ती पाने लवकरच डागपडून व दमटपणाने खराब झाली) वगैरे गोष्टी पाळतो. मात्र वाचताना काहि खायला/प्यायला असले तर मी ते घेतो ही वाईट खोड (पुस्तक आरोग्याच्या दृष्टीने) असली तरी अजूनतरी त्यामुळे पुस्तक खराब झालेले नाहि.
याशिवाय प्रवासात पुस्तक घेताना मात्र तात्पुरते वर्तमानपत्राचे कव्हर डबल घालतो.
ज्यांना शक्य असेल त्यांनी महत्त्वाची पुस्तके टिकण्याच्या दृष्टीने बायडींग करून घेतली तर अधिक टिकावीत.
२. जी सतत लागतात त्याचे दोन गठ्ठे आडवे व नुकत्याच वाचलेल्याचा, वाचत असणारी पुस्तकं त्यांच्या मधे उभी ठेवतो. साधारण असं (=||=). जी पुस्तके सतत लागत नाहिती ती बंद कपाटात आडवी रचून कापडात बांधून, डांबराच्या गोळ्यांबरोबर ठेवली आहेत. (त्याने फायदा होतो की नाहि माहित नाहि, असंच स्वतःच्या डोक्याने काहितरी केलं आहे)
३. उत्तर वर दिले आहे. मी डांबराच्या गोळ्या वापरतो पण त्याने उपयोग होतो का हे माहित नाहि.. डांबराच्या गोळ्या आणि पुस्तकाचा थेट स्पर्श होणार नाहि हे बघावे कधीकधी ह्या गोळ्यांनाच पाणी सुटते.
वेदश्री
वेदश्री · Sun, 27 Jun 2010 - 16:07 · उत्तर
ऋ,
१. मला वाटते इथे तू काही गोष्टींमध्ये 'न' टाकायचे विसरलायस.. जसे की 'पुस्तक वाचताना पाने मुडपणे'. असो. मीही वरती कव्हर्स घालण्यातले जे तोटे सांगितले त्यामुळे सद्ध्या कव्हर्स घालणे बंद केले आहे पण पुस्तकांच्या अंगभूत कव्हर्सची चमक गायब होत चालली आहे त्यामुळे माझ्या मनात कव्हरचा मुद्दा परत उफाळून वर आला आहे.
२. तुझा =||= मांडणीचा मुद्दा तर मस्त आहे पण तो कमी पुस्तकांसाठी योग्य ठरावा बहुदा. माझ्याकडे एका खोलीत भरवलीये आम्ही आमची घरगुती लायब्ररी. कोण कुठले पुस्तक वाचायला घेईल काहीच सांगता येत नाही कारण आमच्याकडे सगळेचजण वाचनवेडे आहेत (वाचनवेडाबद्दल मीच अगदी नसल्यात जमा आहे!). पुस्तके बंद पेटीत, कपाटात ठेवून झाली आहेत आधीच्या घरांमध्ये पण आता मात्र तसे करणे अगदी जीवावर आले आहे.. शेवटी पुस्तकांवर अगदी जिवंत दोस्तावर असावे तसेच प्रेम आहे घरातल्या प्रत्येकाचे.
३. डांबराच्या गोळ्या तर कधी ठेवल्या नाहीत कारण तुझा त्यांना पाणी सुटण्याचा मुद्दा अगदी बरोबर असल्याने भीती वाटते.
अजून एक प्रश्न आठवला तो म्हणजे -
४. जुन्या काही पुस्तकांची पाने पिवळी पडतायत.. असे होऊ नये म्हणून काही उपाय आहे का?
मस्त कलंदर
मस्त कलंदर · Sun, 27 Jun 2010 - 15:55
मी पण कव्हर्स घालत नाही.. आणि पुस्तक दुमडणे, कोपरे दुमडणे प्रकार मला मुळीच आवडत नाही.. (माझे बुकमार्क्स इथे कामी येतात)
माझे एक मित्र, त्यांच्याकडे किमान हजारभर पुस्तके असतील, अर्थात त्यांचीही सगळी वाचू न झाली नाहीएत. पण ते पुस्तक खरेदी केल्या केल्या पाठच्या पानावर खरेदी दिनांक घालतात. आणि पुस्तकांना प्लास्टीकचे कव्हर घालतात. स्टेपल न करता, सेलो टेपने कव्हरच्या कडा चिकटवतात.. त्यांची अत्यंत जुनी पुस्तके पण अगदी नवीन वाटतात.
आम्ही दोघेही, पुस्तक कुणी वाचायला मागितले, मग ते अभ्यासाचे असो वा कसलेही, पुस्तकावर पेनाने खुणा करायच्या नाहीत, असे बजावूनच देतो.
वेदश्री
वेदश्री · Sun, 27 Jun 2010 - 16:13 · उत्तर
क्या बात है! कुठल्या प्लास्टीकचे कव्हर घालतात ते सांगू शकशील का? कारण माझ्याकडे अगदी दासबोध, महाराष्ट्र सारस्वतापासून ते गोट्या, फास्टर फेणे पर्यंतची पुस्तके आहेत.. वेगवेगळ्या जाडी, लांबी, रुंदीची त्यामुळे तशा मापाची कव्हर्स कुठून पैदा करायची हा एक प्रश्न उभा राहिलाय मनात. सेलो टेपने कव्हरच्या कडा चिकटवणे ही कृती पूर्णपणे डोळ्यासमोर आणता येत नाहीये पण काहिसा आंधळा प्रयत्न करुन पहायला खचितच हरकत नाही.
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Mon, 28 Jun 2010 - 10:50
माझे दोन(-चार आगाऊ) पैसे-
१. घराच्या दर्शनी भागात पुस्तके ठेवावीच लागल्यास व्याकरण, शब्दकोश, तत्त्वज्ञान, चर्चा-समीक्षकी मुलाखती, कविता अशा प्रकारची ठेवावीत. कादंबर्या, कथा, निरनिराळ्या विषयांतली ललित पुस्तकं, इतर कोणतीही पुस्तकं - ज्यांच्याबद्दलची जनमानसातली आवड+क्रेझ+अकारण उत्सुकता+लेटेस्ट फॅशन आणि ज्यांच्याबद्दलची तुमची आवड+क्रेझ+आपुलकी यांचं प्रमाण सारखं असेल - बैठकीच्या खोलीत / तून सहसा दिसणार नाहीत, अशा प्रकारे आवरून ठेवावीत.
२. चुकून एखादे जिव्हाळ्याचे पुस्तक बाहेर राहिले आणि कुणी 'कसे आहे रे हे' अशी पृच्छा केलीच (या प्रकारची पृच्छा करणारे लोक सहसा एकीकडे हाताने पुस्तकाची पाने पलटवत असतात. जसे काही एका दृष्टिक्षेपात त्यांना पुस्तकाचा आवाका कळणार आहे आणि त्यांच्या मताची निव्वळ खातरजमा करून घेण्यासाठी ते तुम्हांला तुमचे मत विचारताहेत-), तर 'छे, बंडल आहे एकदम' (तुच्छतापूर्ण आवाजात) किंवा 'हम्म्म्म्म.... डिपेण्ड्स..' (विचारमग्न मुद्रा करून), 'ठीकाय... पण तू बोअर होशील... फार चावलीय बाई...' (आवाजात आदरमिश्रित जिव्हाळा आणून) असे एखादे वाक्य फेकावे.
३. शक्यतो पुस्तकांना कव्हरे घालावीत. मग ती वर्तमानपत्राची का असेनात. कव्हर जितकं अनाकर्षक असेल, तितकं उत्तम, जेणेकरून लोक उत्सुकतेने माना वाकड्या करकरून - किंवा आगाऊपणाने ('हम्म... तेलविहिरी. वाचाय्ला इतका वेळ कसा रे मिळतो? कामधंदा नाही वाटतं?') - किंवा भोचकपणाने पुस्तकाबद्दल प्रश्न विचारणार नाहीत.
४. इतके सगळे करूनही कुणी चिकाटीने पुस्तक मागतच राहिले, तर कधीतरी ते द्यावेच लागते. कधी कधी वाचनाचा तात्कालिक किडा चावलेले लोक हावरटासारखे एकदम दहा-बारा पुस्तके उसनी नेऊ पाहतात. त्यांना वेळीच ठेचावे लागते. अशा वेळी शक्य तितका तुसडेपणा करून 'मला तमक्याला द्यायचे आहे हं, झाले की लगेच दे', 'हे झाले की परत दे, मग दुसरे देईन' किंवा 'हे नाही तुला आवडणार...' असे काहीतरी बोलण्याचे कौशल्य आत्मसात करून ठेवावे.
५. पुस्तक नेणार्यांतले पुष्कळसे लोक ते सोईस्कर विसरून जातात, 'देऊ की, आहे नीट, काय घाई आहे?' असे आपल्यालाच उद्दामपणे विचारतात, किंवा चक्क 'कुठेतरी गेलं रे ते. तमक्या त्या ह्यानी नेलं वाट्टं..' असं निर्लज्जपणे सांगतात. अशा लोकांची आपल्या ब्ल्याकलिस्टात कायमची नोंद करून ठेवावी.
६. काही लोक मात्र आठवणीनं पुस्तक परत आणून देतात (कधीकधी भोचकपणे ब्राउन कलरचे कव्हर घालून देतात. बहुधा हे लोक गटणे वर्गातले.), बरं वाटलं / नाही आवडलं भरभरून सांगतात, त्यांच्याकडे असलेले एखादे विशेष पुस्तक आपल्याला देऊ इच्छितात. अशा माणसे कुठल्याही लक्षणांखेरीज ओळखणे सरावाने जमते. त्यांच्याशीच देव-घेव व्यवहार करावेत. बाकी जग आपल्याला हळूहळू शिष्ट म्हणून ओळकू लागतेच, त्यांच्याकडे चश्मिष्ट+शिष्ट नजरेनं पाहून दुर्लक्ष करावे. पुस्तके आणि आपण सुखी राहायला लागतो.
प्रकाश घाटपांडे
प्रकाश घाटपांडे · Mon, 28 Jun 2010 - 11:58 · उत्तर
अगदी अस्सेच करावे!
मी पुस्तकांचे कव्हर घालायला लहानपणी ब्रुक बॉण्ड कंपनीच्या दुकानातुन चहाच्या मालाची खाकी रंगाची कव्हर आणायचो. उत्तम जाड कव्हर भरपुर टिकायची त्यानंतर पुण्यात आल्यावर फुटपाथवरील फिल्मी मासिके रद्दीच्या दुकानातुन घेउन त्याची गुळगुळीत कागद वापरु लागलो त्याचा परिणाम उल्टा झाला लोक पुस्तके कव्हरपोटी हातात घेउ लागली. मग वाचायला मागतोय की काय अशी भिती वाटायला लागली
खाकी कव्हर अनाकर्षक असते व मुखपृष्ठही दिसत नाही त्यामुळे इतरांच्या तावडीतुन पुस्तके वाचतात.
वेदश्री
वेदश्री · Mon, 28 Jun 2010 - 16:23 · उत्तर
छप्पर तोड प्रतिसाद आहे हा अगदी! भयंकर पटेश. भाग - २ कधी?
मनिष
मनिष · Mon, 28 Jun 2010 - 19:22 · उत्तर
असेच शिकलोय आता मी पण बर्याच वाईट अनुभवातून!
ऋषिकेश
ऋषिकेश · Mon, 28 Jun 2010 - 20:40 · उत्तर
छप्परतोड प्रतिसाद हेच खरं. :)
प्रतिसाद वाचून+आठवून केव्हाचा हसतोय!
=))
नंदन
नंदन · Fri, 2 Jul 2010 - 00:57 · उत्तर
बाब्बौ! खतरनाक प्रतिसाद! :)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 28 Jun 2010 - 10:58
मी पुस्तके जपण्यासाठी काहिच करत नाही..
हे काम पण आउटसोर्स करावे का???
वेदश्री
वेदश्री · Mon, 28 Jun 2010 - 16:26 · उत्तर
>>हे काम पण आउटसोर्स करावे का???
वरील वाक्यातले 'पण' म्हणजे? साक्षात पुस्तकंच आउटसोर्स करायची असली तर सांग! ;-)
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Mon, 28 Jun 2010 - 17:40 · उत्तर
नाही हो म्हणजे कसे कव्हर लाउन वैगेरे मिळतात का या अर्थी
वेदश्री
वेदश्री · Mon, 28 Jun 2010 - 18:23 · उत्तर
ओहो अस्सं होय! बरं बरं.. भावना पोहोचल्या बरं! :)
यशोधरा
यशोधरा · Mon, 28 Jun 2010 - 15:47
पहिली गोष्ट म्हणजे कोण्णालाही पुस्तके उधार देऊ नयेत! माझे एक नवेच्या नवे पुस्तक मैत्रिणीने नेले आणि जुनाट, खिळ्खिळे करुन आणून दिले, वरून, त्यात काय असा अॅटीट्यूड! कानफाटावी असा संताप झालेला जीवाचा :(
हल्लीच मीच तसाच मूर्खपणा भीड ह्या दुर्गुणाने (माझ्याच) पुन्हा एकदा केल्यामुळे अजून एका पुस्तकाची तशीच गत झाल्येय थोडीफार! :( ही व्यक्ती वेगळी. पण ह्या वेळी ह्या व्यक्तीचे एक पुस्तक अजिबात परत न करता मी सूड उगवलाय! :D
क्रमशः
वेदश्री
वेदश्री · Mon, 28 Jun 2010 - 18:26 · उत्तर
चारोळ्या लिहून क्रमशः म्हणणार्यांचा घोर निषेध! :) पहिली गोष्ट झाली.. आता दुसरीपासूनच्या पुढच्या कधी? लवकर लिही.
यशोधरा
यशोधरा · Mon, 28 Jun 2010 - 19:58 · उत्तर
अगं वेळ नाई ना सध्ध्या :(
१. मीही पुस्तकांना कव्हर्स घालत नाही - निव्वळ आळशीपणा.
२. कोनेकोपरे दुमडत नाही मात्र.
३. बोटाला थुंकी लावून पुस्तकांची पानं चाळणारे लोक.... हरे रामा रे!! वाचवा!!
४. पुस्त़कं एकूणच हळुवार रीत्या हाताळली तरी व्यवस्थित राहतात.
५. शक्यतो उभी ठेवते आणि बाइंडिंग केलेली बाजू बाहेरच्या बाजूला येईल, असं, म्हणजे नावही पटकन कळत. पुस्तक काढून बघायला लागत नाही.
६. महिन्यातून एकदा तरी पुस्तकांचा कप्पा व्यवस्थित लावते, असला तरीही. मग ते पुस्तक जरा बघायचं, त्यावर धूळ बसू पाहत असेल तर ती पुसून घ्यायची वगैरे असं करता येतं.
७. माझी काही जुनी पुस्तकं पिवळी, खरं तर करडी पडली आहेत... :(
खास असं मी काही करत नाही खरं तर. ऋचे मार्ग छान वाटले.
विष्णु वडेर
विष्णु वडेर · Sun, 26 Dec 2010 - 11:01 · उत्तर
यशॊधराताई, संस्कृतमध्यॆ एक सुभाषित आहॆ, तॆ आपल्याला माहीत आहॆ ना?
`पुस्तकम वनिता वित्तं परहस्तॆ गतं गतं....
माया ज्ञानेश
माया ज्ञानेश · Mon, 28 Jun 2010 - 21:10
वरचे ' सगळे ' उपाय तर करतेच मी..फक्त कव्हर घालत नाही....
याशिवाय-
१ सहा महिन्यातून एकदा सगळ्या पुस्तकांना ऊन दाखवते. हवा लागू देते.
२ पुस्तकांच्या नोंदणीची एक वही पुस्तकांच्याच कपाटात ठेवते. कोणी पुस्तक मागायला लागले की त्याच्या नावावर असलेली आधीची पुस्तके आधी आणून द्यायला सांगते. ( आणि 'खडूस' म्हणवून घेते ! )
३ पुस्तकांची यादी साहित्यप्रकारानुसार अद्ययावत ठेवते. ( स्वतःच्या डायरीत )
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Tue, 29 Jun 2010 - 09:55
तुमचा प्रतिसाद वाचला आणि अचानक अशी सोय ईथे उपलब्ध करुन देता येईल का हा प्रश्न मनात आला.
म्हणजे पुस्तकांची यादी तर ईथे माझा ग्रंथसंगह मधे तयार करता येईलच. पण त्याला साहित्यप्रकारानुसार करता येईल का??? त्याच सोबत एखाद्याला आपले ग्रंथालय जर प्राईव्हेट ठेवता येईल का??? एखादे पुस्तक कोणाला दिले आहे त्याची नोंद ठेवता येईल का??? असे प्रश्न मनात आले.
यानुसार सोयी करायचे ठरवले तर नक्कीच करता येतिल. यावर पुस्तकविश्वाच्या पुढच्या फेजसाठी नक्की विचार करण्यात येईलच. मला तरी डायरी पेक्षा ऑनलाईनच अशी लिस्ट मेंटेन करायला आवडेल.
ऋषिकेश
ऋषिकेश · Tue, 29 Jun 2010 - 10:58 · उत्तर
वा! निखिल,
लय भारी कल्पना आहे.. बघ जमतं का.. जमल्यास फारच मस्त काम होईल..
फक्त हे करणं म्हणजे एका ग्रंथालयासाठीची मिनी प्रणाली बनविल्यासारखं झालं की!
शुभेच्छा!
यशोधरा
यशोधरा · Tue, 29 Jun 2010 - 15:29 · उत्तर
ऑटोमॅटीकली होऊ नाही का शकणार हे? म्हंजे अ़जून कष्ट वाचतील! :D
निखिल देशपांडे
निखिल देशपांडे · Tue, 29 Jun 2010 - 15:36 · उत्तर
पुलंचा जोक आठवला "का हो तिकडे पण ऑटोमॅटिकच का???" ;)
यशोधरा
यशोधरा · Tue, 29 Jun 2010 - 15:42
LOL!
आनंदयात्री
आनंदयात्री · Fri, 2 Jul 2010 - 03:23
या धाग्यावरच्या सगळ्या प्रतिसादकांना आणि भन्नाट उपाय सुचवणार्यांना विनंती
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
जरा एक एक पुस्तक वाचायला द्या ना राव !!
;)
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · Fri, 2 Jul 2010 - 09:03 · उत्तर
घ्या! एवढं लिहिलं तरी वर हे आहेच! ;)
श्रावण मोडक
श्रावण मोडक · Fri, 2 Jul 2010 - 10:06
बापरे...
बोलती बंद. माझ्याकडची पुस्तकं का जातात हे आत्ता कळ्ळ... :)
मला आता माझ्या एका मित्राची काळजी वाटू लागली आहे. कारण त्यानं त्याचं ३बीएचके घर माझ्यासाठी खुलं केलंय. घरभर वाचनसामग्रीच आहे. अफाट रेंज आहे पुस्तकांची. सीडी, कॅसेट्स आहेत. आणि मुख्य म्हणजे या मित्राच्या हातच्या स्वयंपाकाला चव आहे. इतकं सारं असूनही माणसात आहे. म्हणूनच मला म्हणतो की त्याच्या गावात गेल्यावर हाटेलात रहायचं नाही. आता मला काळजी घ्यावी लागेल. त्याच्याकडं गेलं तर पुस्तक तिथंच वाचण्याची सवय लावून घ्यायची. अर्धं राहिलं तरी तिथून तसंच निघायचं आणि पुढच्या ट्रीपमध्ये ते पूर्ण करायचं. बापरे... पुढे विचार खुंटले आहेत.
मेघना, उपायांचा प्रतिसाद भारीच. बराच अनुभव गाठीशी आहे असं दिसतंय. :)
स्वाती
स्वाती · Wed, 7 Jul 2010 - 10:38
मी सध्या याच विचारात आहे. पुस्तकांची काळजी कशी घ्यावी. सध्या तरी प्लास्टीकचे कव्हर घालणे चालु केले आहे. मोठा रोल आणला आहे तो कापुन कव्हर घालते. अजुनतरी कुठेही सेलोटेप किंवा स्टेपलरची पीन न मारता कव्हर टिकुन आहे. मला पण त्या पीना मारणे प्रकरण आवडत नाही. वर त्या हाताला लागु पण शकतात.
मेघना. तुमच्या यादीतले थोडेतरी मुद्दे मला लहानपणी माहित असते तर माझी बरीच बालपणीची पुस्तके वाचली असती. :-( . आजुबाजुच्या कार्ट्यांनी अक्षरशः फाडुन पुस्तके दिलीयेत आणि त्यानंतर सुद्धा नवीन घेउन गेलीयेत. :-(
टग्या
टग्या · Wed, 7 Jul 2010 - 18:20
...आपली पुस्तके कधीही दुसर्याला वाचायला देऊ नयेत.
याचे कारण अनेकांनी 'पुस्तके इतरांकडून हाताळली जाताना निष्काळजीपणे हाताळली जातात, आणि फाटक्यातुटक्या अवस्थेत परत मिळतात' असे दिलेले आहे. (याला माझी पुस्ती: अनेकदा अशा प्रकारे पुस्तके उधार घेणार्या निष्काळजी लोकांच्या घरातले 'नीटनेटके' आणि 'काटेकोर' सदस्य, स्वतःच्याच घरातील निष्काळजी लोकांना शिस्तीचा 'आदर्श' घालून देण्यासाठी, अशा पुस्तकांवर स्वतःचे नाव लिहितात, असाही अनुभव आहे. पण ते असो.)
तर अशा प्रकारे पुस्तके उधार दिल्यानंतर फाटक्यातुटक्या किंवा खराब झालेल्या किंवा दुसर्याचे नाव लिहिलेल्या अवस्थेत परत मिळतात म्हणून तक्रार करणार्या लोकांस 'भाग्यवान आहात!' एवढेच मी म्हणू शकतो. 'भाग्यवान' अशासाठी, की त्यांना पुस्तके परत तरी मिळतात.
याबाबतीत असा अनुभव आहे, की उधार दिलेली पुस्तके (मागितली तरी) सहसा परत मिळत नाहीत. कारण उधार घेणार्याने ती सहसा (बहुधा न वाचताच) परस्पर तिसर्याला उधार दिलेली असतात. अशा तीनचार कड्यांतून ती साखळी पुढे गेली, की मग ती पुस्तके नेमकी कोणा(कोणा)कडे आहेत याचा पत्ता लागणे अशक्य होऊन बसते. कड्या आणखी वाढल्या, की मग मूळ उधार घेणार्यास पुस्तकांचा(चे) अंतिम धारक व्यक्तिशः परिचित असणे तर सोडाच, पण अशी(शा) व्यक्ती अस्तित्वात आहे(त) हे सांगोवांगी माहीत असण्याची शक्यताही कमीकमी होत जाते. (असा अनुभव वसतिगृहांमध्ये वगैरे हमखास येतो, पण अन्यत्र येत नाहीच, असे नाही.)
पुस्तके उधार घेणार्यांमध्ये ती जबाबदारीने वापरून परत करणार्यांचे प्रमाण खूपच कमी आहे, असे निरीक्षण आहे. अशी विरळा माणसे आपल्या भाग्यात असली तर गोष्ट वेगळी, अन्यथा पुस्तके ही स्वतःच्या जबाबदारीवर इतरांस उधार द्यावीत, आणि जमल्यास संबंध तुटले तरी हरकत नाही, पण पुस्तके उधार न देण्याचे धोरण ठेवावे, असे सुचवावेसे वाटते.
अवांतरः वैयक्तिक मालकीच्या पुस्तकांचे सोडा. फारा वर्षांपूर्वी पुण्यात राहत असताना एकाने ब्रिटिश लायब्ररीतून आणलेले एक पुस्तक उधार मागितले होते. त्यावेळी आमच्या तीर्थरूपांनी परखडपणे 'ब्रिटिश काउन्सिल लायब्ररीचे पुस्तक आहे; मिळणार नाही. इथे येऊन वाचायचे तर वाच.' असे स्पष्टपणे तोंडावर सांगून 'भीड' या दुर्गुणाच्या दुष्परिणामांतून आमची सुटका केल्याचे आठवते. (एवढेच वाचायचे असेल, तर स्वतः सदस्यत्व घेऊन स्वतःच लायब्ररीतून आण की xxव्या! पण नाही. लोकांकडून लोकांच्या जबाबदारीवर आणण्यात मजा वेगळीच असावी. फार कशाला, दुर्मिळ पुस्तकांच्या बाबतीत दुसर्याच्या सदस्यत्वावर उधार घेण्याची मनीषा उरात बाळगून वर "तुम्ही नंतर लायब्ररीला 'हरवले' म्हणून सांगा; जो काही दंड पडेल त्याचे पैसे मी तुम्हाला देईन" हेही ऐकवणारे महाभाग पाहिलेले आहेत. तेव्हा, In the world of book-borrowing, there are no such things as ethics हे गृहीतक - वरकरणी कितीही अन्यायकारक वाटले तरीही - बाळगूनच व्यवहार करावेत, हे श्रेयस्कर.)
मेघना भुस्कुटे
मेघना भुस्कुटे · गुरुवार, 8 Jul 2010 - 08:39 · उत्तर
अगदी अगदी.....
गुंडोपंत
गुंडोपंत · Mon, 12 Jul 2010 - 07:50 · उत्तर
मी मित्रांना पुस्तकमित्रांना'कायमचे दिल्यासारखेच' देतो!
एकदा वाचून झाले की काय करायचे असते असेही जमवून?
त्यापेक्षा फिरते पुस्तक बरे. शिवाय कुणी परत दिलेच तर अजून कुणाला देता येते. नाही दिले तर आनंदानेच दिल्याने तसा काही त्रास नसतोच!
(आमच्या 'ही' ला मात्र ते आवडत नाही, ती अगदी येथे कुठेतरी दिल्याप्रमाणे रजिस्टरच ठेवते कोणते पुस्तक कुणी नेले त्याचे. ) मी परस्पर कुणाला दिले की तीची पंचाईत होते. ;)
असो,
तुम्ही बुक क्रॉसींग http://www.bookcrossing.com/ पाहिले आहे काय?
यशोधरा
यशोधरा · Tue, 28 Dec 2010 - 17:06 · उत्तर
>>ती अगदी येथे कुठेतरी दिल्याप्रमाणे रजिस्टरच ठेवते कोणते पुस्तक कुणी नेले त्याचे. >> ब्येष्ट :)
आरागॉर्न
आरागॉर्न · Wed, 17 Nov 2010 - 15:26 · उत्तर
भावना पोचल्या. कितीतरी लोकांना बुकमार्क असतात आणि त्यांचा उप्योग असतो हेच ठाउक नसते बहुधा. जिथे वाचणे थांबेल तिथे पालथे करून ठेवायचे. मग पुस्तक वाचून झाल्यावर त्याची पाने आकाशाच्या दिशेला जातात. मग ते पुस्तक सरळ करण्यासाठी सहा महिने पुस्तकांच्या गठ्ठ्याखाली ठेवावे लागते.
धागा छान आहे.
टग्या
टग्या · Sat, 4 Dec 2010 - 03:50 · उत्तर
यावरून 'पुस्तक काय म्हणते' याबद्दलचे एक संस्कृत सुभाषित आठवले. (संस्कृत शुद्धलेखनाची आणि व्याकरणाची चूभू द्याघ्या, आणि जमल्यास दुरुस्त करा.)
"तैलात् रक्षेत्, जलात् रक्षेत्, रक्षेत् तु शिथिलबन्धनात्|
मूर्खहस्ते न दातव्यं," एवं वदति पुस्तकम्||
आरागॉर्न
आरागॉर्न · Sat, 4 Dec 2010 - 07:39 · उत्तर
सुभाषित आवडले.
याचा अर्थ पुस्तकांची काळजी अशी चर्चा प्राचीन काळातही होत असावी असे मानायला हरकत नाही. :)
टग्या
टग्या · Sat, 4 Dec 2010 - 07:55 · उत्तर
...हे आधुनिकोत्तर (नवसंस्कृत) सुभाषित असावे.
कसें? ;-)
३_१४ अदिती
३_१४ अदिती · Sat, 4 Dec 2010 - 16:31 · उत्तर
कधीचंही असलं तरी नुस्तीच कविता नसून नक्कीच सुभाषित आहे.
भाग्यश्री
भाग्यश्री · Sat, 10 Jul 2010 - 21:33
वरचे उपाय तसेच कव्हर घालणे मी आवर्जुन करते. नवीन पुस्तक घरात आल्यावर माझ्यासारखी वाचन्वेडी ते वाचायचे सोडून कव्हर घालत बसलीय हे पाहून नवरा हसला होता! पण तेही महत्वाचे आहे. कव्हर घालून माझे नाव व विकत घेतल्याची तारिख घालणे हे बाबांपासून शिकलेली गोष्ट.
पानं उलटताना व्यवस्थित उलटते, उगीच दुमडली वगैरे जात नाहीये ना पाहते, थुंकी वगैरे अर्थात निषिद्ध.
पान लक्षात राहण्यासाठी बुकमार्क्सच वापरते, पुस्तक तिथेच उलटे ठेवणे वगैरे नाही. त्याने बर्याचदा बाईंडींग खराब होते.
माझ्याकडे आत्ता मोजकीच पुस्तके असल्याने सगळी पारायणे होतातच, पण माहेरी मी पुस्तक महिनोन महिने कपाटात पडले आहे, असे कधीच होऊ दिले नाही. हवाही लागते, वाचले तर जातेच. बुकरॅक आवरणे हा फार श्रीमंत करणारा अनुभव असतो. मी कप्ड्यांचे कपाट आवरायला कंटाळा करते पण पुस्तकांचे कायमच आवरते. प्रत्येक पुस्तक हातात घेऊन , पटकन आवड्त्या लाईन्स वाचून ठेऊन देणं, आणि आपल्याकडे मोजकीच का होईना पण लायब्ररी तयार होतीय याचा आनंद अनुभवणे ही सगळ्यात मस्त गोष्ट!
पुस्तकं देऊ नयेत हे अगदीच खरं! भिडस्त स्वभाव असेल तर अजिबातच नाही!
हा अजुन एक उपयुक्त दुवा: http://www.maayboli.com/node/9876
भाग्यश्री
भाग्यश्री · Sat, 10 Jul 2010 - 21:10
प्रकाटाआ
वेदश्री
वेदश्री · Mon, 12 Jul 2010 - 07:02
मस्त कलंदरने सुचवल्यानुसार पुस्तकांना अंगरखे घालण्यासाठी पारदर्शक प्लास्टीकचा रोल घेतला आहे आणि पारदर्शक सेलोटेपदेखील. आता कव्हर्स घालण्याच्या पंचवार्षिक कामात मी आईला मदत करेन असे ठरवले होते पण ते एकंदरीत माझ्यावरच पडते की काय असे झाले आहे.. कारण आई पुस्तकवाचनातूनच बाहेर येत नाहीये! :(
पुस्तकावर नावे अथवा अन्य काही लिहिण्याची सवय नाही आईला आणि म्हणूनच आम्हालाही नव्हती. परंतु कोणाला कुठल्या निमित्ताने (वाढदिवस, बक्षिस वगैरे) पुस्तक दिल्यास तसे कौतुकाचे चार शब्द लिहिण्याची मात्र लहानपणी सवय होती आम्हा पोराटोरांना. आता मात्र सवयी बदलल्या आहेत. पुस्तके घेतली की त्यातल्या आतल्या पानावर जेथे पुस्तकाचे आणि लेखक/लेखिकेचे नाव लिहिलेले असते त्या पानावर अगदी छोट्या अक्षरात आईचे किंवा बाबांचे नाव लिहिते मी आता. जुन्या पुस्तकांवर देखील लिहिले आहे.
गुंडोपंत
गुंडोपंत · Mon, 12 Jul 2010 - 07:44 · उत्तर
हे मी कधी कधी करतो!
पण पुस्तक घेतले रे घेतले, की ते कधी आणि कुठे घेतले,
कसे घेतले हे पण लिहून ठेवतो. काही पुस्तकांवर तर प्रदर्शनातल्या सेल्समन चे नावही लिहिलेले आहे :)
(सावाना मध्ये घेतले, विक्रेता लक्ष्मण)
नंतर वाचायला खुप मजा येते आणि त्यातच आपल्या त्या क्षणीच्या मनस्थितीचा एक तुकडा लिहून ठेवलेलेला असेल तर (मलपृष्ठाच्या आतल्या बाजूला वगैरे) तर मग अजूनच मजा येते. मला तर त्यामुले अजून काही गोष्टीही आठवतात!
असो,तुम्ही फारच पुस्तक जपत असाल तर असे लिहिणे खपणारे नाही हे मला माहिती आहे. पण मी लिहितो, त्यामुळे त्या पुस्तकावर एक 'माझी मुद्रा' असते ;)
वेदश्री
वेदश्री · Mon, 12 Jul 2010 - 08:18 · उत्तर
<गुंडोपंत>पण पुस्तक घेतले रे घेतले, की ते कधी आणि कुठे घेतले,
कसे घेतले हे पण लिहून ठेवतो. काही पुस्तकांवर तर प्रदर्शनातल्या सेल्समन चे नावही लिहिलेले आहे
(सावाना मध्ये घेतले, विक्रेता लक्ष्मण)
नंतर वाचायला खुप मजा येते आणि त्यातच आपल्या त्या क्षणीच्या मनस्थितीचा एक तुकडा लिहून ठेवलेलेला असेल तर (मलपृष्ठाच्या आतल्या बाजूला वगैरे) तर मग अजूनच मजा येते. मला तर त्यामुले अजून काही गोष्टीही आठवतात! असो,तुम्ही फारच पुस्तक जपत असाल तर असे लिहिणे खपणारे नाही हे मला माहिती आहे. पण मी लिहितो, त्यामुळे त्या पुस्तकावर एक 'माझी मुद्रा' असते < /गुंडोपंत>
हाहाहा! तुमची पुस्तके ही केवळ तुमचीच आहेत असे जाणवतेय. आमच्याकडे मात्र अख्ख्या घराची असल्यासारखी असतात पुस्तकं मग असे एकानेच त्यावर आपली 'मुद्रा' उमटवणे कितपत योग्य ठरणार? शिवाय आठवणींबद्दल प्रायव्हसी नावाची चीजदेखील रहात नाही (काही आठवणींबद्दल ही अत्यंत महत्त्वाची!) त्यामुळे पुस्तकाच्या स्वास्थ्या-सौंदर्याबरोबरच या गोष्टींसाठीदेखील या आणि अशाप्रकारच्या सर्व गोष्टी मी माझ्या डायर्यांमध्ये (एकीत हिशोबाचे तर दुसरीत आठवणींचे!) लिहिणे जास्त श्रेयस्कर समजते. :) आणि पुस्तके जपण्याबद्दल म्हणाल तर काळजाच्या तुकड्यांना कोण जपणार नाही.. खासकरून जर ते शरीराबाहेर असतील तर?
गुंडोपंत
गुंडोपंत · Mon, 12 Jul 2010 - 07:39
पाण्याचे ग्लास शक्यतो पुस्तकापासून दूर ठेवा इतकेच म्हणेन.
इतक्यातच 'विंदांच्या काव्यावर' अक्षरश: पाणी सांडले मी... हा हा हा!!
आता ते वाळेपर्यंत वाट पाहतोय...
प्लॅस्टीकचे कव्हर असते तरी वाट लागली असती.
असो, चालायचेच!
पुस्तकाच्या अवस्थेसोबतच त्यात काय लिहिलेय ते महत्त्वाचे, नाही का?
आपला
गुंडोपंत
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · Wed, 17 Nov 2010 - 19:41
पुस्तकांची काळजी कशी घ्यावी यावर जरी १००% रामबाण उपाय नसला तरी इथल्या प्रतिसादातील काही विकल्प व्यावहारिक पातळीवर छान वाटतात. पण सर्वात चांगला कुठला असेल तर आपल्या अती-भीडस्त स्वभावाला आळा घालून निधडेपणाने पुस्तक-मागणीला नकार देणे....अर्थात काही सन्माननीय अपवादही करता येतील, जसे एखादा हाडाचा वाचक आहे असे जाणवणे, विद्यापीठ परीक्षासंदर्भात 'रेफरन्स बूक' म्हणून मागणी करणारा एखादा स्कॉलर विद्यार्थी वा अभ्यासक...!
वैयक्तिक पातळीवरील माझी समस्या अशी आहे की आमच्या घरातील पुस्तकांची जी दोन कपाटे आहेत तीत प्रामुख्याने माझ्या मामांचा पुस्तकांचा साठा असल्याने व ते जणू काही 'तुकाराम' परंपरेचे पाईक असल्याने त्या कपाटाना कुलुप कधीच नसते त्यामुळे त्यांच्याकडे राबता असलेल्या कित्येकांना ती (आणि वैयक्तीक पातळीवर मी घेतलेली...) सहज हाताळता येतात. मागे एकदा मिपावर मी 'सावित्री' कादंबरीचा किस्सा लिहिला होता....जी कादंबरी खुद्द श्री.पु.शि.रेगे यांनी स्वाक्षरी करून 'एका करवीरकरास सप्रेम' असे लिहून मामांना भेट दिली होती व जी माझ्या अजागळपणे हरविली होती....त्यावर आलेल्या प्रतिक्रियांतूनदेखील हीच गोष्ट प्राधान्याने प्रकटली होती की, स्पष्टपणे 'नाही...' म्हणणे हाच जालीम उपाय आहे, पुस्तक काळजीच्याबाबतीत.
दुसरा मुद्दा....जी आहेत ती पुस्तके कशी सांभाळता येतील. आमच्या कॉलेजच्या लायब्ररीयन याना आम्ही दोनचार मित्रांनी मागे एकदा अशाच विषयावरील गप्पागोष्टीत सहजगत्या विचारले असता त्यानी आनंदाने ज्या दोन-चार बाबी सांगितल्या त्यात समावेश होतो तो ~~ 'पुस्तके आठवड्यातून किमान एकदा हलवावीत....झटकली नाहीत तरी चालेल...पण त्यांच्या जागा बदलाव्यात. जागा बदलणे म्हणजे कपाट बदलणे असे नसून खालच्या कप्प्यातील वरच्या कप्प्यात ठेवणे....अॅन्ड व्हाईस व्हर्सा....एकेक करून....एकदम चारपाच घेऊ नयेत....यामुळे असे होते की, जी पुस्तके बराच काळ वापरात नाहीत त्यावर नकळत हात वा यलो क्लॉथ फिरला जातो व ती नेटकेपणे पुनश्च नांदू लागतात. जी पुस्तके वापरात आहेत त्यांचा 'बोन' अधूनमधुन तपासावा, जेणेकरून जर गोंद हलके झाले असेल तर त्यावर उपाय करता येतो.'
बाईंडींग हाही एक चांगला उपाय आहे, पण होते असे की, का कोण जाणे, बायंडिंग करून आणलेली पुस्तके फार एकसुरी दिसतात...त्यातील चार्मच निघून जात्तो.
पुस्तकांच्याबाबतीत जितकी काळजी घेतली जाते तितकी मॅगेझिन्स वा दिवाळी अंकांबाबत घेतली जात नाही ही गोष्टही मान्य व्हावी....मी तर आमच्याकडील गेल्या दशकभरातील जवळपास साठसत्तर दिवाळी अंक ग्रामीण भागातील दोनचार युवा वाचनालयालाच देवून टाकली आहेत. उगाच घरी त्यांना रद्दीरूप आलेले पाहण्यापेक्षा दहाबारा वाचकांना किमान काही आनंद तरी मिळाला असेल. उद्यापरवा काही पुस्तकांच्या बाबतीतही असाच निर्णय घेण्याची वेळ येणार अशीच चिन्हे दिसत आहेत.
इन्द्रा
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 18 Nov 2010 - 04:47 · उत्तर
जर पुस्तके जुनी अथ्वा आता मुद्रण न होणारी असली तर असे करण्याआधी किमान पुस्तके स्क्यान करून ठेवा हा सल्ला. स्कॅन केल्यावर निदान मजकूर दिर्घकाळ जवळ राहील व जागाही अडणार नाही. स्कॅनिंगसाठी मदत हवी असल्यास सांगणे.
मागे नंदनच्या ह्याच सुचनेला अनुमोदन देताना म्हटल्याप्रमाणे, अनेकांनी काहि पाने वाटून घेतल्यास / पुस्तके वाटून घेतल्यास १/२ महिन्यात बरीच पुस्तके/मासिके स्क्यान करून व्हावीत
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 18 Nov 2010 - 09:40
"....पुस्तके स्क्यान करून ठेवा हा सल्ला..."
~ मनापासून धन्यवाद या सल्ल्याबद्दल....खरं सांगायचं झालं तर हे डोक्यात अजिबात आले नव्हते. स्कॅनिंगची काही अडचण नाही....या क्षेत्रातील तीनचार चांगले मित्र आहेतच जे सहज मला हे काम करून देतील. अर्थात रूढार्थाने ज्या पुस्तकांना 'दुर्मिळ' असे संबोधिले जाते त्याबाबतच स्कॅनिंग केमिस्ट्री अंमलात आणावी...अन्यथा ज्यांच्या नव्या आवृत्या प्रतिमाह बाजारात येतच असतात त्या पुस्तकाना स्कॅन यादीत घेण्यातही काही अर्थ नसतो.
थॅन्क्स ऋषि.
इन्द्रा
ऋषिकेश
ऋषिकेश · गुरुवार, 18 Nov 2010 - 10:49 · उत्तर
बरोबर.. म्हणूनच "जर पुस्तके जुनी अथवा आता मुद्रण न होणारी असली तर" हे वाक्य घातले होतेच :)
चिंतातुर जंतू
चिंतातुर जंतू · गुरुवार, 18 Nov 2010 - 11:06
माझ्या सभासदत्वापूर्वीचा धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद. मागे अरूण टिकेकरांच्या एका लेखात त्यांनी 'पुस्तकांच्या कपाटात वेखंड ठेवल्यामुळे पुस्तकं टिकतात' असं म्हटलं होतं. बहुधा वेखंड आर्द्रता शोषून घेत असावं. धूळ आणि आर्द्रता हे पुस्तकांचे दोन मोठे शत्रू आहेत. निष्काळजी माणसं हाही एक शत्रू, पण त्याविषयी वर पुरेसा उहापोह झालेला दिसतो.
अवांतरः संस्थळाविषयीची एक सूचना/पृच्छा: ऐतिहासिक महत्त्वाचे विशिष्ट धागे व्यवस्थापकांतर्फेच संस्थळावरच्या कायमस्वरूपी वाचनखुणा म्हणून खुणा करून ठेवता येतील का? व्यक्तिगत वाचनखुणांपेक्षा अशा संस्थळ-पुरस्कृत वाचनखुणा संदर्भ म्हणून उपयोगी पडतील.
इंद्रराज पवार
इंद्रराज पवार · गुरुवार, 18 Nov 2010 - 11:39
".....'पुस्तकांच्या कपाटात वेखंड ठेवल्यामुळे पुस्तकं टिकतात'...."
~ चिं.जं. - हा वेखंड प्रयोग मी करून पाहिला आहे....तो कितपट टीकाऊ वा वर्णन केल्याप्रमाणे गुणधर्मी आहे हे पाहण्याअगोदरच काय घडले ते लिहितो.
सल्ला असा मिळाला होता की, वेखंडाचे काही तुकडे (थोडेसे ठेचून) कपाटात पुस्तकांच्या आगेमागे टाकावेत वा पसरावेत व काही दिवस कपाट घट्ट बंद करावे. ~~ तसे केले. जी पुस्तके वापरात होती किंवा ज्याना, त्या आठवड्यात, हाताळले जाण्याची शक्यता होती ती वगळता, ती टेबलवर रचून, बाकी सर्व पुस्तकावर 'वेखंड जादू' केली. तब्बल एक आठवड्यानंतर जेव्हा 'प्रोग्रेस' पाहण्यासाठी कपाट उघडले तर एक प्रकारचा रासायनिक म्हणा वा वनस्पती कुजल्यासारखा दर्प तिथे पसरला होतो. वेखंडामुळे असा वास अपेक्षित होताच, त्यामुळे आश्चर्य काही वाटले नाही, पण दुसर्या एका गोष्टीने लक्ष चांगलेच वेधले...अन् ते म्हणजे लाल मुंग्यांची कपाटात उसळलेली तोबा तोबा म्हणायला लावणारी गर्दी !
बाप रे ! महाभारतात वर्णन केलेले असते तसे अठरा अक्षौहोणी मुंगी सैन्य कपाटातील पुस्तकांवर बिनदिक्कत आणि मग्रुरीने राज्य करीत होते....त्यानी तेवढ्यात तीन पालीं आणि पतंगसद्दर्श्य एका पाखराचाही फडशा पाडला होता. हे सर्व घडले ते वेखंडात असलेल्या गोडीगुलाबीच्या सुगंधामुळे.
पुरा एक दिवस गेला ते साम्राज्य नष्ट करायला...आणि पुस्तकासाठी आता कोणती नवी रणनिती अंमलात आणावी यावर पुनश्च ये रे माझ्या मागल्या !
इन्द्रा
मनिष
मनिष · Sun, 21 Nov 2010 - 07:29 · उत्तर
हे वेखंड म्हणजे काय असते? ठेवायचा विचार होता, पण इंदर च अनुभव वाचून रद्द केला! :-)